दरम्यान, येथील सहाय्यक अभियंता सुशील हिप्परगी म्हणाले की, कार्यरत असताना कोणी व्यसन करून येत असेल, तर अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कोणी कर्मचारी गैरफायदा उठवत असेल तर त्याची त्यांना किंमत मोजावी लागेल.
ढालगाव येथील वीज कर्मचाऱ्यांच्या मनमानी बद्दल ‘ लोकमत ’ने आवाज उठवला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. आता येथील कोविड केंद्रात अखंड वीजपुरवठा देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात येणार आहे.
हिप्परगी म्हणाले की, काही कर्मचारी परस्पर कागदपत्रे व पैसे घेऊन ती कार्यालयाकडे पोहच करीत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे व पैसे ग्राहकांनी देऊ नयेत अथवा दिल्यास त्याची पावती घ्यावी. शक्यतो कार्यालयातच कागदपत्रे व इतर व्यवहार करावेत.
कार्यालयात संगणकाचा अभाव व मोबाईलचे नेटवर्क अभाव यामुळे कामात अडथळा येतो. तसेच चौदा गावासाठी कायम स्वरूपी कर्मचारी फक्त दोन आहेत. नऊ कर्मचारी हंगामी आहेत. चार यंत्र संचालक कमी आहेत. वीज केंद्रात पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्था व खडीची कमतरता, झुडपे तोडण्यासाठी ठेकेदाराला काम देणे याबाबतीत वरिष्ठांना लेखी व प्रत्यक्ष कल्पना दिली आहे, असेही ते शेवटी म्हणाले.