लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) याच्या कारकीर्दीतील इ. स. १०७७ सालचा जैन शिलालेख सापडला आहे. महामंडलेश्वर जोगम कलचुरी याने अंकलखोप येथील जैन मंदिराचा जीर्णोद्धार करताना हा दानलेख लिहून ठेवला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासकांनी याचे संशोधन पूर्ण केले.
मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला आहे. महेंद्र बाळकोटगी यांनी याचे वाचन केले. पलूस तालुक्याचा समावेश त्यावेळी कराड प्रांतात होता, हे या शिलालेखातून स्पष्ट होते. जोगम कलचुरीचा हा महाराष्ट्रातील पहिला शिलालेख आहे.
येथील शिवव्याख्याते अतुल पाटील यांनी गावात शिलालेख असल्याची माहिती समाधीकोशकार प्रवीण भोसले यांच्यामार्फत मिरज इतिहास संशोधन मंडळास दिली. हा शिलालेख अंकलखोपमधील जैन गल्ली रोडलगत चौगुले यांच्या घराच्या अंगणात आहे.
शिलालेख अभ्यासासाठी डॉ. जयवर्धन पाटील, अतुल पाटील, प्रणव देशपांडे, महेश चौगुले, श्रद्धेश गायकवाड, राहूल चौगुले, शिरीष गुरव, प्रा. प्रताप पाटील, डॉ. रोहित सकळे, सागर कांबळे (शंबर्गी), सर्व मानकरी, युवक आणि ग्रामस्थ यांचे संशोधकांना सहकार्य लाभले.
या शिलालेखावर मध्यभागी पद्मप्रभ तीर्थंकरांची प्रतिमा, बाजूला गाय-वासरू आणि सूर्य चंद्राचे शिल्पांकन आहे. खालील बाजूस हळे कन्नड लिपीतील मजकूर आहे. प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी शिलालेखाचे ठसे घेऊन त्याचा अभ्यास केला. महेंद्र बाळकोटगी यांनी या लेखाचे वाचन करून दिले. या शिलालेखात एकूण ६१ ओळी आहेत. या शिलालेखात चालुक्य राजा विक्रमादित्याचा मांडलिक असलेल्या जोगम कलचुरी याने अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून अंकलखोप येथील जैन मंदिराचा जीर्णोद्धार सुरु केला. त्यासाठी ९ एप्रिल १०७७ रोजी हा दान लेख लिहून ठेवला. हा जोगम कलचुरी त्यावेळी विक्रमादित्याच्यावतीने कराड प्रांताचा कारभार पाहत होता.
चौकट
अंकलखोप पूर्वी होते अंकुलखप्पू
सध्या सांगली जिल्हयात समाविष्ट असणारे अंकलखोप हे गाव साडेनऊशे वर्षांपूर्वी ‘करहाड-४०००’ या प्रांतात अंतर्भूत असल्याचे या शिलालेखावरून स्पष्ट होते. या लेखात अंकलखोपचा उल्लेख ‘अंकुलखप्पू’ असा आला आहे.