लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले : कोरोनाची संक्रमण साखळी रोखण्यासाठी मांगलेकरांनी केलेले संस्थात्मक विलगीकरण आदर्श असून जिल्ह्यातील इतर गावांनी यांचे अनुकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी चौधरी यांनी मांगले शाळेतील कोरोना विलगीकरण केंद्रास व आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी रुग्णाच्या सोयी-सुविधांबाबत आढावा घेतला. ३३ रुग्ण दाखल असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य केंद्रातील कोरोना विशेष कक्षास भेट देऊन पाहणी केली.
कर्मचारी कमी असल्याने अडचणी येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र घड्याळे यांनी सांगितले.
मंगलनाथ उद्योग समूहाचे प्रमुख विजय पाटील यांनी सॅनिटायझर, साबण व खाद्यपदार्थांचे किट दिले. डॉ. सतीश पाटील व डॉ. नितीन पोर्लेकर यांनी रुग्णांशी संवाद साधून तपासणी करून मोफत औषधे दिली.
यावेळी डॉ. जयसिंग पवार, प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, डॉ. प्रवीण पाटील, सरपंच मीना बेंद्रे, उपसरपंच धनाजी नरुटे उपस्थित होते.