लोकमत न्यूज नेटवर्क
ढालगाव : कुर्डुवाडी ते ढालगाव रेल्वे विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांच्या प्रतिनिधी पथकाने गुरुवारी सायंकाळी चार वाजता केली. यावेळी ढालगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने विविध मागण्यांंचे निवेदन देण्यात आले.
ढालगाव येथे महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरोबा देवाच्या दर्शनासाठी भाविक रेल्वेने येतात व येथून आरेवाडी बनात जातात. त्यामुळे येथे कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-यशवंतपूर यासह लांबपल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा, रेल्वे स्थानकापलिकडे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने पादचारी पूल व्हावा, रेल्वे पोलीस ठाणे व्हावे, रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग व विजयपूर - गुहागर राज्य मार्ग अनुक्रमे पाच व तीन किलोमीटरवरुन जात असल्याने आरक्षण व्यवस्था, रेल्वे पुलाखालील पाणी व खराब रस्ते दुरुस्ती, मुंबईला जाणाऱ्या गाड्या ढालगावमार्गे सोडल्यास अंतर व वेळेची बचत अशा सर्व समस्या उपसरपंच माधवराव देसाई, वसंतराव कोळेकर, पोपट धोकटे, सलीम मुजावर, शिवाजी देसाई यांनी मांडल्या. सोलापूर व पंढरपूर येथे प्रत्यक्ष भेटा व पाठपुरावा केल्यास समस्या सोडविण्यासाठी नक्की प्रयत्न करू, असे आश्वासन गुप्ता यांनी दिले.
यावेळी रेल्वे विद्युतीकरण विभागाचे प्रमुख ए. के. जैन, पी. तिवारी, डी. एन. मौर्य, ताजुद्दीन शेख, जनार्दन देसाई, अभिजीत मायणे, नागेश शेटे उपस्थित होते.