सांगली : जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफची एक तुकडी पाच बोटीसह सांगलीत कृष्णा नदीवर दाखल झाली आहे. या पथकाने नदीपात्रामध्ये बोटीच्या सहाय्याने पाहणी करत अग्निशमन विभागाकडून माहिती घेतली.यावेळी महापालिकेचे अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती पथकाला दिली. शहर परिसरामध्ये अद्याप पूरस्थिती नसली तरी खबरदारीच्या उपाय म्हणून एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या २२ जणांचे पथक सांगलीत दाखल झाले आहे. ३० ऑगस्टपर्यंत एनडीआरएफचे पथक सांगलीमध्ये राहणार आहे.या पथकाने शुक्रवारी कृष्णा नदीपात्राची माहिती घेतली. बोटीतून नदीपात्रात फेरफटका मारला. अग्निशमन विभागाकडून गत पुराचीही माहिती घेतली.
सांगलीत एनडीआरएफकडून कृष्णा नदी पात्राची पाहणी, पाणी पातळीत वाढ
By शीतल पाटील | Published: July 21, 2023 7:12 PM