: कणेगाव (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय महामार्गावर कुरळप पोलीस ठाण्याच्यावतीने तपासणी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तांदूळवाडी : जिल्हाबंदी लागू झाल्याने गुरुवारी रात्रीपासून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कणेगाव (ता. वाळवा) येथील फाट्यावर कुरळप पोलीस ठाण्याकडून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. जिल्ह्याबाहेर जाण्याचा परवाना, कोरोना चाचणीचा अहवाल तपासला जातो. मालवाहतुकीच्या वाहनांची तपासणी केली जात नाही. राष्ट्रीय महामार्गावर तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू आहे.
कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणेगाव येथे वाहन तपासणी सुरू आहे. मात्र आरोग्य विभागाचे पथक नसल्याने मागील वर्षीसारखी तपासणी अद्याप तरी दिसत नाही. आरोग्य तपासणी पथक नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीती आहे. प्रवासादरम्यानचा वाहनधारकांचा पास लांबूनच व वाहनातूनच तपासला जात आहे.