सुशांत घोरपडे
म्हैसाळ : महाराष्ट्रातूनकर्नाटकात प्रवेश करताना कर्नाटक सरकार सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करते; पण कर्नाटकातील प्रवासी महाराष्ट्रात बिनधास्त प्रवास करतात, हे कसे चालते, असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.
सध्या ओमायक्राॅन या कोरोनाच्या नव्या आवृत्तीमुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने मिरज - कागवाड या राज्य-महामार्गावर कागवाडजवळ आरटीपीसीआर तपासणी केंद्र सुरू केले आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना प्रत्येक प्रवाशास आरटीपीसीआर चाचणी अहवाल किंवा स्वॅब देणे बंधनकारक आहे.
दुसरीकडे कर्नाटक राज्यातील प्रवासी दररोज हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रात येत असतात. पण महाराष्ट्रात प्रवेश करताना त्यांची कोणत्याही प्रकारची तपासणी केली जात नाही. त्यामुळे कर्नाटकमधून येणारे प्रवासी बिनधास्तपणे महाराष्ट्रात प्रवास करीत आहेत. मग महाराष्ट्रातून कर्नाटकात जातानाच कोरोना होतो का, असा प्रश्न वाहनधारक उपस्थित करीत आहेत. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकातील प्रवाशांचीही तपासणी करूनच महाराष्ट्रात प्रवेश द्यावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.