ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील चिकुर्डे महसूल मंडलमधील पर्जन्यमापक यंत्र मंडलच्या मध्यवर्ती भागात बसवावे, अशी मागणी ढगेवाडी, कार्वे, ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी या गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.
बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळता यावेत, यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र उभारावे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत सतत निसर्गाचा लहरीपणा दिसून येत आहे. त्याचा फटका विहीर बागायत शेतकऱ्यांना बसत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीमुळे शेतकरी नेहमे संकटात सापडत आहेत. मंडलमध्ये झालेल्या पावसाचे मोजमाप घेण्यासाठी पर्जन्यमापक असले तरी आज घडीला ते कालबाह्य ठरत आहे. चिकुर्डे मंडलमध्ये ११ गावांचा समावेश आहे, पण मंडलपासून ते शेवटच्या गावापर्यंतचे अंतर १२ किलोमीटर आहे. त्यामुळे मंडलमधील पर्जन्यमापक यंत्र शोभेची वस्तू बनल्यामुळे २०१९ मध्ये गावे दुष्काळी यादीतून वगळली. कार्वे, ढगेवाडी, शेखरवाडी, ऐतवडे बुद्रुक या चार विहीर बागायत ग्रामस्थांनी उपोषण केले. निवडणुकीवर बहिष्काराचा इशाराही दिला. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी पर्जन्यमापक यंत्र मंडलच्या मध्यवर्ती ठिकाणी बसवून तो प्रश्न मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. याबाबत सबनीस म्हणाले की, प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवला आहे. मंजुरी मिळाली की ते काम मार्गी लागेल.
चौकट
शासनाकडे पाठपुरावा सुरू
पर्जन्यमापक यंत्र लवकर बसवून मिळावे, यासाठी पालकमंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड, शशिकांत शेटे यांनी दिली.
चौकट...
पर्जन्यमापक यंत्र शोभेची वस्तू..
गेली तीन ते चार वर्षे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. चिकुर्डे महसूल मंडलमध्ये पावसाचे मोजमाप घेण्यासाठी पर्जन्यमापक यंत्र आहे, ते कोठे आहे, याचा शोध युवक घेत आहेत. संबंधित विभागातील अधिकारीही त्याबद्दल अनभिज्ञ आहेत. हे यंत्र म्हणजे शोभेची वस्तू बनली असल्याचे मंडलमधील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.