लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील प्रमुख ३० हून अधिक चौकांमध्ये अपघात व वाहतुकीची कोंंडी टाळण्यासाठी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा उभी करावी, अशी मागणी सोमवारी शिवसेनेच्यावतीने वाहतूक शाखेकडे करण्यात आली.
वाहतूक निरीक्षक देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रातील सुमारे ३० ते ४० चौकांमध्ये वाहतुकीच्या शिस्तीसाठी सिग्नलची व्यवस्था नसल्याने अशा चौकात अत्याधुनिक सिग्नल्स बसवावेत. सर्व प्रमुख रस्त्यावर आर.सी.सी. दुभाजक बसवावेत. सर्व रस्त्यांवर, गल्लीत झेब्रा क्रॉसिंग व मध्यभागी पांढरे थर्मो प्लास्ट पट्टे मारावेत.
तरुण भारत क्रीडांगण, राजवाडा चौक, जुना स्टेशन चौक, काँग्रेस भवन, राम मंदिर चौक ते जिल्हा परिषद या रस्त्यावर पर्यायी उड्डाणपूल करावे. मार्केट यार्ड चौक, विश्रामबाग चौक ते न्यायालयाची मध्यवर्ती इमारत या मार्गावरही उड्डाणपुलाची निर्मिती करावी. मिरजेतील मिशन हॉस्पिटल चौकात, तसेच मिरज येथील जुन्या बस स्टँड चौकातही उड्डाणपूल उभारावे.
यासाठी महापालिकेने येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी व राज्य शासन व महापालिका मिळून एकत्रितपणे मागणी पूर्ण करावी. यावेळी निरीक्षक प्रज्ञा देशमुख म्हणाल्या की, या सिग्नल, रस्ता दुभाजक, झेब्रा क्राॅसिंग आमच्या कक्षेत येतात. हा प्रस्ताव महापालिकेकडे पाठवून तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावेळी रावसाहेब घेवारे, बाळासाहेब मगदूम, प्रभाकर कुरळपकर, प्रसाद रिसवडे, जितेंद्र शहा, राहुल यमगर, आदी उपस्थित होते.