गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुझार चौकात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मशिदीमध्ये न्यू गणेश मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आष्टा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित आवटे, निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सहायक निरीक्षक संतोष यादव, दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठापना करण्यात आली.मशिदीमध्ये गणपती प्रतिष्ठापनेचे ४४ वे वर्ष आहे. यावेळी मुस्लीम व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. १९८० साली येथील झुंझार चौकातील मोकळ्या जागेमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना होत होती. त्यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गणपती कोठे स्थापन करावयाचा? असा प्रश्न उपस्थित झाल्याने हिंदू, मुस्लीम बांधवानी एकत्रित मशिदीमध्येच न्यू गणेश मंडळाच्या गणपतीची स्थापना करण्याचे ठरवले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी गणपतीची प्रतिष्ठापना मशिदीमध्ये करण्याची परंपरा कायम आहे. मुस्लीम बांधव दररोज एकत्रित येऊन गणपतीची आरती करतात. मशिदीत साजरा होणारा येथील गणेशोत्सव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे व सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरला आहे.या मंडळाने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासारखे सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गोटखिंडी येथील सर्वात मोठे मंडळ व हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक अशी या मंडळाची ओळख आहे.यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश फाळके, सचिव राहुल कोकाटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात, ॲड. अर्जुन कोकाटे, ठिबक सिंचनचे प्रवर्तक विनायक पाटील, जालिंधर थोरात, सचिन शेजावळे, रियाज मुलानी, प्रशांत थोरात, रोहन थोरात, हनुमंत जाधव, सोन्या जिनगर, सनी थोरात, आदित्य महाजन, सचिन पेटकर, पिंटू महाजन, संदीप शिंगटे, इलाई पठाण, प्रमोद स्वामी यांच्यासह हिंदू-मुस्लीम बांधव उपस्थित होते.
सांगलीतील गोटखिंडीत ऐक्याची परंपरा.. मशिदीत गणेशाची प्रतिष्ठापना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 7:07 PM