सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक संकटात असताना त्यांना मदत करण्याऐवजी भाजपचे राज्यातील व स्थानिक नेते, आमदारही राजकारण व आंदोलन करण्यात मग्न आहेत, अशी टीका कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, पालकमंत्री जयंत पाटील, कॉँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी वैयक्तिक पातळीवर संकटातील लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परप्रांतीयांसाठी कदम यांनी रेल्वे व संबंधित लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. कॉँग्रेसचे स्थानिक कार्यकर्तेही लोकांची मदत करीत आहेत.
एकीकडे सत्तेत असणारे कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे घटक पक्ष संकटात लोकांसाठी धावून जात असताना, भाजप नेत्यांना केवळ राजकारण करण्याव्यतिरिक्त काही करता आले नाही. लोकांना मदत करण्याऐवजी आंदोलन करून वातावरण कलूषित करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. सत्तेत नसल्यामुळे त्यांना पोटशूळ उठला आहे.राज्यातील भाजप नेत्यांनी राजकारण करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचे अनुकरण आता स्थानिक भाजप नेतेही करू लागले आहेत. आमदार सुधीर गाडगीळ हे स्वत: व्यापारी आहेत. तरीही त्यांनी व्यापाऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. मदतीऐवजी ते केवळ सत्ताधारी पक्षावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत.पाटील म्हणाले की, आंदोलन लोकशाहीतील अधिकार असला तरी, कोणत्यावेळी आंदोलन करावे, याचे भानही भाजपला राहिलेले नाही. लोक संकटात असताना त्यांना राजकारण केलेले आवडत नाही. तरीही भाजप संकटात राजकारण करीत आहे.