सांगली : रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांतील ठेवींना विमा संरक्षण दिले आहे. त्याप्रमाणे राज्यातील पतसंस्थांतील ठेवींना पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन मुख्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह सर्वांना मानपत्र देण्यात आले.
पवार म्हणाले, राष्ट्रीयीकृत बँकांतून बडे भांडवलदार कर्ज काढतात, थकवतात आणि एक रकमी परतफेडीतून ५० टक्के माफी घेतात आणि सर्वसामान्य कर्जदारांची जप्ती होते. हा कारवाईचा भेदभाव कशासाठी?
राज्याच्या वैभवात भर टाकणारी कर्मवीर ही पहिली पतसंस्था आहे. पतसंस्थांचे संचालक कोण यावर ठेवी जमतात. कर्मवीरमध्ये डॉक्टर, वकील, व्यावसायिकांकडे बघून ठेवी जमल्या आहेत.
संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील म्हणाले, छोट्याशा खोलीतून विश्वासार्हता व पारदर्शी कारभारामुळे संस्थेचा वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा भारती चोपडे, डॉ. एस.पी. मगदूम, डॉ. नरेंद्र खाडे, डॉ. रमेश ढबू, लालासाहेब थोटे, ए.के. चौगुले, वसंतराव नवले, ललिता सकळे, अप्पासाहेब गवळी, बजरंग माळी, महेश संत, डॉ. एस.बी. पाटील, गुळाप्पा शिरगिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम आदींची उपस्थिती होती.
चांगल्या संस्थांत कर्मवीर प्रथमच - विश्वजित कदम
गेल्या काही वर्षांत पतसंस्थांपुढे अडचणी होत्या. मात्र, यातून कष्टातून ज्या टिकल्या त्यांना सध्या चांगले दिवस आलेत. त्यात कर्मवीरचा प्रथम क्रमांक असल्याचे गौरवोद्गार सहकार राज्यमंत्री डॉ. कदम यांनी काढले.