कडेगाव : चौथीची राज्यस्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा बंद झाली आणि सांगली जिल्हा परिषदेने जिल्हास्तरावर परीक्षा घेतली. या शिष्यवृत्ती निकालात पुन्हा गोलमाल झाल्याचे स्पष्ट होत आहे. पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.या परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम खासगी एजन्सीकडे दिले होते. यासाठी दोन लाख रुपये खर्च केले. परंतु निकालात मात्र मोठ्या प्रमाणावर गोलमाल असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत फेरतपासणीसाठी पालकांचे अर्ज मागवले. फेरतपासणीत भाषा आणि गणित विषयांच्या गुणांमध्ये बदल झाले. परंतु बुद्धिमत्ता चाचणी या पेपरची फेरतपासणी झालीच नाही, अशी तक्रार कडेगाव तालुक्यातील काही पालकांनी केली आहे.कडेगाव जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी सई प्रदीप महाडिक हिला भाषा विषयात ९८ गुण आहेत, तर गणित विषयात ९६ गुण आहेत. याच विद्यार्थिनीला बुद्धिमत्ता चाचणी विषयात मात्र १०० पैकी फक्त ६० गुण मिळाले आहेत. बुद्धिमत्ता चाचणी या विषयात १०० पैकी १०० गुण असतील व जिल्ह्यात प्रथम क्रमांकही माझाच असेल, असा विश्वास सई प्रदीप महाडिक हिने व्यक्त केला आहे. या प्रथम क्रमांकाच्या दावेदार मुलीच्या पालकांनीही तिची उत्तरपत्रिका त्रयस्थ शिक्षक किंवा अधिकाऱ्यांना दाखवावी आणि फेरतपासणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच शाळेचाच विश्वजित शिवनंदन पवार या कडेगाव जि. प. विद्यार्थ्यांला बुद्धिमत्ता चाचणी या विषयात फक्त दोन गुण मिळाले आहेत. हा मुलगा आणि त्याचे पालकही, गुणवत्ता यादीत स्थान मिळणारच, असा दावा करीत आहेत. असामान्य बौद्धिक क्षमतेच्या या मुलाला फक्त दोन गुण मिळतात, यावरून पेपर तपासणीत गोलमाल असल्याचे स्पष्ट होते.बुद्धिमत्ता चाचणीचे पेपर पुन्हा तपासले जावेत किंवा उत्तरपत्रिका पालक किंवा त्रयस्थांना दाखवाव्यात, अशी मागणी विश्वजितच्या पालकांनी केली आहे. अशाप्रकारे फेरतपासणीतही गोलमाल झाल्याने पालकवर्गातून संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)उत्तरपत्रिका दाखविणार - नीशादेवी वाघमोडेचौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या फेरतपासणीतील निकालाबाबतही पालकांच्या तक्रारी आहेत. संबंधित पालकांना उत्तरपत्रिका दाखविण्याचीही आमची तयारी आहे, असे शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी सांगितले.‘लोकमत’चा दणकाचौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपर तपासणीत गोलमाल झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. यावर फेरतपासणी झाली आणि काही विद्यार्थ्यांना न्याय मिळाला, तर काही विद्यार्थ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. कडेगावचे दोन विद्यार्थी अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
बुद्धिमत्ता चाचणी पेपरची फेरतपासणी नाहीच!
By admin | Published: May 30, 2016 11:28 PM