विकास शहाशिराळा : करमाळे (ता. शिराळा) येथे इंटस टाॅवरच्या बॅटरी चोरीप्रकरणी सात जणांची आंतरराज्य टोळी शिराळा पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील गाडी, टॉवरच्या बॅटरी, शेती विद्युत पंप आदी आठ लाख ८२ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दयाशंकर नंदकुमार निनाद (वय ३८, मूळ गाव रेंगणा, ता. बिंदकी, जि. फतेहपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. शिराळा), रामसरण राम आचरे (वय ३१, रा. रेंगणा मजरे, चांदपूर, ता. बिंदकी, जि. फतेहपूर, सध्या रा. शिराळा), रामनारायण सुखलाल निनाद (वय ३९, रा. कोरवल धौरहरा, ता. बिंदकी, जि. फतेहपूर), विश्वंभर रामलखन निशाद (वय २९, रा. गजइपुरता, बारा, बिंदकी, जि. फतेहपूर), देसराज जियालाल निशाद (वय ४५, रा. महाता या. बागुआ, जि. फतेहपूर), हुकूमचंद श्रीरामदिन निनाद (वय २५, रा. रेंगणा, ता. बिंदकी, जि. फतेहपूर), संतोष ऊर्फ कमलकांत निरंजन नायर (वय ३७, रा. बिरजपूर, ता. गुबुडा, जि. गोंजाम, राज्य ओडिशा), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत अमोल शामराव माळी यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.करमाळे येथे शुक्रवार, दि. १५ रोजी सायंकाळी साडेसहा ते शनिवार, दि. १६ रोजी सकाळी १० वाजेदरम्यान इंटस टाॅवरच्या शटरचे कुलूप तोडून आतील बॅटरी बॅंकेमधील एकूण ३६ बॅटरी सेल चोरट्यांनी लंपास केले होते.शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक बिऊर गावच्या हद्दीत गस्त घालत असताना उतर प्रदेश पासिंग असलेली मोटार (क्र. यू. पी. १६ ए.के. ६८५६) पंक्चर अवस्थेत उभी होती. यावेळी मोटारीतील संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी गाडी तपासली असता त्यामध्ये चोरीस गेलेल्या बॅटरी सेलपैकी काही बॅटरी सेल व चोरीसाठी वापरलेली हत्यारे निदर्शनास आली. पोलिसांनी अधिक चाैकशी केली असता त्यांनी करमाळे येथील चोरीची कबुली दिली.त्यांच्याकडून २ लाख ४६ हजार १४४ रुपये किमतीच्या मोबाइल टाॅवर बॅटरी सेल, ६ लाख रुपये किमतीची मोटार, २४५० रुपये किमतीची चोरीकरिता वापरलेली हत्यारे, १४ हजार रुपयांचा मोबाइल व २० हजार रुपये किमतीची पाण्यातील विद्युत मोटार असा एकूण आठ लाख ८४ हजार ५४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र माने करीत आहेत.
करमाळे चोरीप्रकरणातील आंतरराज्य टोळी जेरबंद, पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 1:23 PM