सांगली : बहुमतात असलेल्या भाजपचा करेक्ट कार्यक्रम करून महापालिकेच्या सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारदर्शी कारभाराची नाळ तुटू लागली आहे. सत्ताबाह्य केंद्राचा हस्तक्षेप वाढल्याने राष्ट्रवादीसह मित्रपक्ष काँग्रेसमधील नगरसेवकही त्रस्त आहेत. खुद्द महापौरांना निर्णयप्रक्रियेचे किती अधिकार आहेत, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सांगलीकरांनी भाजपच्या पारड्यात मताचे दान टाकले; पण अडीच वर्षांतच भाजपच्या सत्तेला ग्रहण लागले. फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री जयंत पाटील यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करीत सत्तांतर घडविले. वास्तविक काँग्रेस नगरसेवकांची संख्या जादा असतानाही महापौरपदाची माळ राष्ट्रवादीच्या गळ्यात पडली. सत्तांतर घडविताना पदड्यामागे अनेक जणांचा हात होता. आता हेच हात महापालिकेच्या कारभारातही हस्तक्षेप करू लागले आहेत.
कधीकाळी महापालिकेचे कारभारी म्हणून या नेतेमंडळींकडे पाहिले जात होते. आता हीच कारभारी मंडळी पालिकेतील सर्वच निर्णयात केंद्रस्थानी आहेत. कारभारी पदाधिकाऱ्यांच्या सूचनांवरच महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनाही डोलावे लागत आहे. अगदी महासभेचा अजेंडा ठरविण्यापासून ते निधीच्या वाटपापर्यंत साऱ्याच कामात सत्ताबाह्य केंद्रांचा हस्तक्षेप वाढला आहे. आरसीएच कर्मचाऱ्यांची वेतनवाढ असो की पथदिव्यांची निविदा असो, प्रत्येक ठिकाणी सत्ताबाह्य मंडळींनीच निर्णय घ्यायचा आणि महापौरांनी तो अमलात आणण्याचा, असा नवा पायंडा पडला आहे.
या हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादीतील काही नगरसेवक नाराज आहेत; पण या पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांचा वरदहस्त असल्याने त्यांचाही नाइलाज झाल्याचे दिसते. तर पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकही स्वहिताचे विषय मार्गी लागावेत, यासाठी सत्ताबाह्य केंद्राची तळी उचलताना दिसतात. राष्ट्रवादीच नव्हे तर मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसमधून सध्याच्या कारभाराबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील या नेत्यासमोरच राष्ट्रवादीच्या एककल्ली कारभाराचे पाढे वाचले होते; पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. सत्ताबाह्य पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने पारदर्शी कारभाराच्या आश्वासनाचे धिंडवडे मात्र निघत आहेत.
चौकट
केवळ मिरविणारे नाहीत कमी
राष्ट्रवादीच्या काही युवा पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या कारभाराबाबत किती ज्ञान आहे, हे कुणालाच माहीत नाही; पण निव्वळ मिरविण्यासाठी पालिकेच्या कारभारात ते ढवळाढवळ करीत आहेत. प्रत्येक निर्णयावेळी हा युवा पदाधिकारी सहभागी असतो. अगदी आयुक्त दालनापासून ते महापौरांच्या दालनापर्यंत त्यांची ऊठबस असते. मंत्र्यांच्या बैठकीला त्याची हजेरी असते.
चौकट
काँग्रेस झाली कमकुवत
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यावर वर्चस्व असतानाही पतंगराव कदम, मदन पाटील हे काँग्रेसचे नेते थेट भिडत होते. पक्षाच्या सन्मानासाठी वेळप्रसंगी राष्ट्रवादीला अंगावर घेण्यास ते मागे पुढे पाहत नव्हते; पण या दोन नेत्यांच्या निधनानंतर काँग्रेसला नेतृत्वाची पोकळी जाणवत आहे. राष्ट्रवादीच्या मागे काँग्रेसची फरपट सुरू असल्याची टीका होऊ लागली आहे.