शीतल पाटील, सांगली: शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशनच्यावतीने सांगलीत रविवार २६ रोजी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती मॅरेथॉनचे अध्यक्ष समित कदम यांनी पत्रकार बैठकीत दिली. या स्पर्धा पाच व २१ किलोमीटर या दोन गटात असून देश-विदेशातील खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ते म्हणाले, जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या शहीद मॅरेथॉनचे दहावे पर्व आहे. विश्रामबाग चौकातून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेसाठी २१ किलोमीटरसाठी विश्रामबाग ते विजयनगर ते मिशन हॉस्पिटल चौकातून परत विश्रामबाग, राम मंदिर, काँग्रेस भवन, जुना स्टेशन चौक, कापडपेठ, टिळक रोड, आयर्विन पुलापासून परत याच रस्त्याने विश्रामबागपर्यंतचा मार्ग असणार आहे. तर पाच किलोमीटरसाठी अशोक कामटे चौक ते राममंदिर चौक परत विश्रामबाग चौक असा मार्ग असणार आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह दिल्ली, लखनऊ, चंदीगड, जयपूर, अहमदाबाद, सूरत, बेंगलोर, अथणी, विजयपूर, केरळसह केनिया, इथोपिया देशातील स्पर्धकही सहभागी होणार आहेत. स्पर्धकांना प्रोत्साहनासाठी झांज-ढोल पथक असणार आहेत. स्पर्धेच्या मदतीसाठी विविध शाळा, संघटना, सामाजिक संस्था व मंडळांनी सहकार्य केल्याचे कदम यांनी सांगितले.
यावेळी डॉ. चंद्रशेखर हळिंगळे, भूषण चिखली, श्वेता चिखली, प्रदीप सुतार, सुधीर भगत, विरेन हळींगळे, दीपक पाटील, योगेश रोकडे, पवन कुंभार, देवीदास चव्हाण, संतोष जाधव आदी उपस्थित होते.