सांगली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी जत तालुक्यातील बालगाव येथे ऐतिहासिक योग शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात २५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने व उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक, ग्रामस्थ सूर्यनमस्कार घालणार आहेत.
या शिबिराचा पाच ठिकाणी विश्वविक्रम करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन करण्यात येत आहे. शिबिराची तयारी अंतिम टप्पात आहे. पिण्याचे पाणी, रूग्णवाहिका, पार्किंग व्यवस्था, रस्ते, वीज व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे केले.जिल्हा प्रशासन आणि गुरुदेव आश्रम, बालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालगाव येथे दि. २१ जून रोजी सकाळी ९ वाजता हे योग शिबीर होणार आहे. या शिबिराच्या तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अमृत नाटेकर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.शिबिरासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून २५ टँकर तैनात करण्यात आले आहेत. उपस्थितांना यातून पिण्याचे पाणी द्यावयाचे असल्याने टँकरची स्वच्छता करून घेण्याचे निर्देश देऊन जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, शिबिराच्या ठिकाणी अन्न आणि पाणी यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी.
दोन्हींचे नमुने प्रमाणित करून घ्यावेत. शिबिरासाठी ३७ रूग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रत्येक रूग्णवाहिकेमध्ये एक वैद्यकीय अधिकारी, एक मदतनीस, पुरेसा औषधसाठा आणि रक्तसाठा, स्ट्रेचर अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, कार्यक्रमस्थळीही प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर वाहने येणार आहेत. त्यामुळे चांगल्या रस्त्यांसाठी ४ टँकर्स व १० ट्रॅक्टरच्या माध्यमातून रस्त्याचे सुस्थितीकरण करण्यात येत आहे. दोन ठिकाणी सुसज्ज पार्किंग व्यवस्था आणि हेलिपॅड व्यवस्था ठेवण्यात येत आहे.
कार्यक्रमस्थळी ७ अग्निशामक दलाच्या गाड्यांची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती देऊन जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, शिबिराच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था ठेवण्यात येत आहे. त्यासाठी ३ जनरेटर (विद्युत जनित्र) ची सोय करण्यात आली असून आवश्यक तेथे वीज वाहिनी आणि खांब यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही दिवस २४ तास विद्युतव्यवस्था ठेवण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, या शिबिरामध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री सुभाष देशमुख सहभागी होणार आहेत. शिबिराच्या पूर्वतयारीसाठी गत १० दिवसांपासून शासन आणि गुरूदेवाश्रम, बालगाव यांच्यामार्फत तयारी सुरू असून, शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी ४५० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.जिल्हाधिकारी काळम म्हणाले, शिबिरासाठी ६० by ४० चे भव्य स्टेज उभारण्यात येणार आहे. उपस्थितांसाठी ८ ब्लॉक करण्यात आले असून, प्रत्येक ब्लॉक ३०० by ३०० चा असणार आहे. कर्नाटकमधून येणाऱ्या नागरिकांच्या नियोजनासाठी विजापूरच्या जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधला आहे.
कोणत्याही विद्यार्थ्याला सक्ती नाही
या शिबिरात सहभागी होण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला सक्ती करण्यात आली नाही. शिबिराच्या सुयोग्य नियोजनासाठी एक हजार स्वयंसेवकही नेमण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
विश्वविक्रमासाठी प्रयत्न सुरू शिबिराच्या लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, मार्व्हल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा पाच ठिकाणी विश्वविक्रमासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे, असेही काळम म्हणाले.