सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील ४ कोटी १८ लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन चौकशी अधिकाऱ्यांची उलटतपासणी तारखांच्या चक्रात अडकली आहे. तत्कालीन चौकशी अधिकारी मनोहर माळी हे पुन्हा सुनावणीस गैरहजर राहिल्याने २६ एप्रिलपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्हा बँकेतील ४ कोटी १८ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी ४० माजी संचालक, तीन माजी कार्यकारी संचालक, ११ अधिकाऱ्यांसह १६ वारसदार अशा ७० जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. यावरील सुनावणी अंतिम टप्प्यात असतानाच, मनोहर माळी यांच्या उलटतपासणीअभावी ही प्रक्रिया रेंगाळली आहे. १५७ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातही माजी चौकशी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे उलटतपासणी रेंगाळली होती. तोच अनुभव सव्वाचार कोटींच्या घोटाळा प्रकरणात येत आहे. जिल्हा बँकेचे २००१-०२ ते २०११-१२ या कालावधीतील बँकेच्या प्रधान कार्यालयाचे रंगकाम व दुरुस्ती, अमृतमहोत्सवी खर्च, नोकरभरती, इमारत बांधकामासाठी केलेला खर्च, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले मानधन, जादा दराने केलेली सीसीटीव्ही खरेदी, एकरकमी परतफेड योजनेतील सवलत, संचालक मंडळांचा अभ्यास दौरा अशा अनेक नियमबाह्य गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. (प्रतिनिधी)जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी ४ कोटी १८ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची जबाबदारी संचालक व कार्यकारी संचालकांवर निश्चितीसाठी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी ४४ माजी संचालक व तीन तत्कालीन कार्यकारी संचालकांना नोटीस दिली होती. त्यानंतर मृत चार संचालकांच्या १६ वारसदारांनाही सुनावणीसाठी नोटिसा बजाविल्या.
उलटतपासणी अडकली तारखांच्या चक्रात
By admin | Published: April 11, 2016 11:04 PM