सांगली : कुपवाड येथील अष्टविनायकनगर परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या मध्य प्रदेशातील टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. यातील एकजण पसार झाला असून, चौघांना जेरबंद करण्यात यश आले आहे. या टोळीने सांगलीसह कोल्हापूर, सातारा, पुणे शहर व पुणे ग्रामीण भागात घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिली.
अटक केलेले सर्वजण मध्य प्रदेशातील असून, केराम ऊर्फ केरमसिंग रमेश मेहडा (वय ३०), गुड्या ऊर्फ गुडीया ठाकूर मेहडा (२०, दोघेही रा. काकडवाल, जि. धार), उदयसिंग रेमसिंग मेहडा (२३, रा. भगोली, जि. धार) यांच्यासह एका अल्पवयीनचा समावेश आहे, तर जगदीश नानसिंग सिंगाड (रा. काकडवाल) असे पसार झालेल्या संशयिताचे नाव आहे.
जिल्ह्यातील घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवत गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिले आहेत. त्यानुसार पेट्रोलिंगवर असलेल्या एलसीबीच्या पथकास कुपवाड-बुधगाव रोडवरील अष्टविनायकनगर येथील एका मंगल कार्यालयाजवळ पाच लोक हिंदीत बोलत बसल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने घटनास्थळी जात छापा मारून चौघांना पकडले, तर एकजण शेजारीच असलेल्या उसातून पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक रविराज फडणीस, संजय क्षीरसागर, उपनिरीक्षक अभिजित सावंत, मारुती साळुंखे, सुनील चौधरी, शशिकांत जाधव, अजय बेदरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
चौकट -
इस्लामपूर येथील साखर कारखान्याजवळील बंद घर फोडून, याशिवाय लॉकडाऊनमध्ये व त्यापूर्वीही इस्लामपूर व सांगली साखर कारखाना परिसरात चोऱ्या केल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून हत्यारे, बॅटरी, मिरची पूड, चांदीच्या वस्तू असा २३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचेही अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले.