इस्लामपूर : शहरातील बसस्थानकाच्या पश्चिमेस असणाऱ्या युनियन बँकेच्या बाहेरून ६० हजार रुपयांची रोकड पळविणाऱ्या दोघा चोरट्यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच चोऱ्यांची कबुली दिली आहे. इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तब्बल पाच दिवस या आंतरराज्य टोळीचा माग काढत त्यातील दोघांना अटक केली आहे.
अजय बाबू जाधव (वय २१) आणि चंद्रू रामू भुई (३०, दोघे रा. अंबरनाथ, ठाणे) अशी या चोरट्यांची नावे आहेत. हे दोघेही अत्यंत धुर्त असून, आपला नेमका ठावठिकाणा ते अद्याप दडवून ठेवत आहेत. हे दोघे मूळचे कर्नाटक किंवा आंध्रप्रदेशातील असावेत, असा पोलिसांचा संशय आहे.
या दोघांनी इस्लामपूर, शिराळा, इचलकरंजी, कोल्हापूर-शाहूपुरी आणि गडहिंग्लज येथे चोऱ्या केल्याची कबुली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला दिली आहे. या दोघांनी शहरातील युनियन बँकेच्या परिसरातून एका निवृत्त वृद्ध आणि त्यांच्या मुलीला चकवा देत त्यांच्याकडील ६० हजार रुपयांची रोकड असणारी पिशवी पळवून दुचाकीवरून पोबारा केला होता.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तब्बल पाच दिवस खर्ची घातले होते. अखेर या दोघांना कागल (कोल्हापूर) येथून पळून जाताना बसस्थानकावर जेरबंद करण्यात आले होते. सध्या हे दोघे पोलीस कोठडीत आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अरुण पाटील अधिक तपास करीत आहेत.