उमेश जाधवकामेरी (जि. सांगली) : दूरचित्रवाणीवर ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या तावडीत सापडल्याचा भाग प्रदर्शित झाल्यानंतर, रडवेल्या झालेल्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल झाला. अखेर या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याची दखल घेऊन, आपण त्या मुलाच्या शोधात असल्याचे सांगितले आणि या निरागस शंभूभक्ताला म्हणजे कामेरी (ता. वाळवा) येथील पाच वर्षांच्या श्रीयोग अनिल मानेला त्यांनी मुंबईला बोलावून घेऊन त्याचा सन्मान केला.
सध्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका नाट्यमय वळणावर आहे. या मालिकेत संभाजी महाराज मोगलांच्या तावडीत सापडल्याचा भाग प्रदर्शित झाला. तो पाहताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. येथील लहानग्या श्रीयोगलाही राहवले नाही. मालिका पाहताना हे लेकरू रडू लागले. सुरुवातीला त्याची आई सविता यांना त्याच्या रडण्याचे कारण लक्षात आले नाही. मात्र काही वेळानंतर कारण समजले. त्यांनी त्याला, ‘ही घटना घडून चारशे-पाचशे वर्षे झाली, रडू नकोस’ असे समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी या संभाषणाचा व्हिडीओ बनविला आणि गावातील व्हॉट्स अप ग्रुपवर पाठविला. तो विविध समाजमाध्यमांतून व्हायरल झाला. लहानग्या लेकराच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहताना, त्याची आई त्याला समजावत आहे, हा व्हिडीओ अनेकांच्या मोबाईलमध्ये पोहोचला आणि त्यांच्या अंगावर शहारा आला.
संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कोल्हे यांच्यापर्यंत हा व्हिडीओ पोहोचला. त्यांनी तो आपल्या फेसबुक अकौंटवर शेअर करून, त्यातील बालकाचे नाव आणि पत्ता कळविण्याचे आवाहन केले. तो कामेरीतील श्रीयोग माने असल्याचे समजल्यानंतर कोल्हे यांनी माने कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधला व श्रीयोगवर ‘शिवसंस्कार’ करणा-या सविता यांचे आभार मानले. श्रीयोगसोबतही संवाद साधला. या माय-लेकराला थेट मुंबईला बोलावणे धाडले. त्यांच्यासाठी मोटार पाठवून दिली. शनिवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी श्रीयोग, त्याची आई सविता व वडील अनिल माने मुंबईस गेले. दुपारी कोल्हे यांनी त्यांची भेट घेतली. श्रीयोगच्या निरागस शिवभक्तीने कोल्हे भारावले. त्याला बालशिवाजीचा पोषाख, सविता यांना साडी-चोळी देऊन त्यांनी माने कुटुंबीयांचा सन्मान केला.श्रीयोगचे मूळ गाव शाहुवाडी तालुक्यातील लोळवणे असून त्याचे वडील अनिल माने व्यवसायाच्या निमित्ताने २०१३ पासून कामेरी येथे पत्नी सविता यांच्यासमवेत नातेवाईकांकडे राहत आहेत. श्रीयोग अंगणवाडीमध्ये लहान गटात शिकत आहे.