नेर्ले : ज्यांनी एकही संस्था व्यवस्थित चालवली नाही. बझार, संस्था मोडून टाकल्या, ते कारखाना चालवायला निघाले आहेत, कृष्णाचे खासगीकरण करण्याचा त्यांचा डाव आहे असा टोला कृष्णाचे माजी अध्यक्ष अविनाश माेहिते यांनी डॉ. इंद्रजित मोहिते यांना लगावला. त्यांनी सांभाळून बोलावे. जो माणूस निवडून येत नाही त्याने आमची मापे काढू नयेत. मी पायाने अधू असलो तरी डोक्याने अधू नाही हे बाप-लेकांनी विसरू नये, असा इशाराही त्यांनी डॉ. सुरेश भाेसले व डॉ. अतुल भाेसले यांचे नाव न घेता दिला.
नेर्ले (ता. वाळवा) येथील धनगर समाजाचे नेते हणमंत वीरकर यांच्या घरी आयोजित बैठकीत अविनाश माेहिते बोलत होते. माजी संचालक वसंतराव पाटील, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील, संचालक सुभाष पाटील, बाबासाहेब पाटील, जीवन माने यांच्यासह सभासद उपस्थित होते.
अविनाश मोहिते म्हणाले, भाेसलेंनी ज्यांच्या नावावर एक गुंठाही शेती नाही अशा लोकांना सभासद केले आहे. अक्रियाशील नोटिसा दिल्या. शेतकऱ्यांचे पैसे देऊन राजीनामे घेतले. त्यांची चूक मोठी आहे. कृष्णा खासगी करण्याचा त्यांचा डाव आहे. निवडणूक आली तरच हे सभासदांना भेटतात. आज आपण चुकलो तर येणाऱ्या काळात कृष्णा कारखाना खासगी झालेला दिसेल. पाच-पाच हजार रुपये कमिशन देऊन दलालामार्फत शेतकऱ्यांचे राजीनामे घेतले. सभासदांची पिळवणूक केली. त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला. वसंत विचार यांनी आभार मानले. यावेळी सचिन पाटील, राहुल पाटील उपस्थित होते.