लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाºया म्हैसाळ (ता. मिरज) येथील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्या प्रकरणाचा अंतिम अहवाल शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने राज्य शासनाला सादर केला आहे. चौकशीत मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे हा दोषी असल्याचे आढळून आले. राज्यात अशाप्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, हेही समितीने सुचविले आहे.मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गर्भपातावेळी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर भ्रूणहत्येचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयामध्ये अवैधरित्या गर्भपात केले जात असल्याचे उघड होताच पोलिसांनी रुग्णालयावर छापे टाकले. तपासादरम्यान १९ अर्भकांचे अवशेष सापडले. खिद्रापुरेच्या रुग्णालयातून कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. खिद्रापुरेला अटक केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती कर्नाटकातील कागवाड, विजापूरपर्यंत वाढली. याची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली. शिवाय केंद्रीय समितीनेही चौकशी केली आहे. म्हैसाळे भ्रूण हत्याकांड कसे घडले? यामध्ये आरोग्य विभाग दोषी आहे का? अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करावला हव्यात? याची चौकशी करण्यासाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली सातजणांची समितीच नियुक्त करण्यात आली होती.म्हैसाळमधील खिद्रापुरे याच्या भारती रुग्णालयाच्या विविध प्रकारच्या बेकायदेशीर नोंदी, तसेच त्याने नेमके काय केले, याचा समितीने अभ्यास केला. अशाप्रकारच्या घडणाºया घटनांसाठी कारणीभूत असलेल्या शासकीय यंत्रणेमधील दोष समितीने शोधले आहेत. या घटनांची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, हेही शासनाला सुचविले आहे. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे यांच्या मृत्यूबाबत तांत्रिक बाबी, तसेच गर्भपातासाठी वापरली गेलेली औषधे कोठून आणली जात होती, खिद्रापुरेकडे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नसतानाही, त्याला ही औषधे कशी काय देण्यात आली, याचीही समितीने चौकशी केली आहे. तब्बल तीन महिने चौकशी सुरु होती. समितीमधील सदस्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर समितीतर्फे डॉ. सापळे यांनी राज्य शासनाला अंतिम अहवाल सादर केला.
भ्रूणहत्येचा अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:18 AM