सांगली : हिंदुराष्ट्र झाले तरच देशात शांतता, सुख व समाधान नांदेल. येथे मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी सगळेजण सुखाने राहतील. कारण हिंदुंच्या ‘डीएनए’मध्ये आक्रमण नाही, कत्तली नाहीत, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पौंक्षे यांनी व्यक्त केले.
श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर येथील दरबार हॉलमध्ये व्याख्यान पार पडले. पोंक्षे म्हणाले की, आज कुणाचे हिंदुत्व खरे आणि कुणाचे खोटे अशी चर्चा केली जाते. पण, त्यांना हिंदुत्व म्हणजे काय तेच माहिती नाही. सावरकरांचे हिंदुत्व सोयीनुसार नव्हते. ते स्पष्टवक्ते होते.
वस्तू, मनुष्य, वनस्पती यांना जन्मजात लाभणारे नैसर्गिक गुण म्हणजे धर्म. हिंदू धर्म हा निसर्गधर्म असल्याने त्याला कुणी संस्थापक नाही. नियम, अटी नाहीत. सर्वांना सामावून घेणारा हा धर्म आहे. ते म्हणाले, या देशावर साडे चारशे वर्ष इस्लामी राजवटींनी आक्रमण केले. हजारो मंदिरे उध्वस्त केली, पण ते हिंदुस्थानला संपवू शकले नाहीत. सावरकर म्हणत, मला मुस्लीम, ख्रिश्चनांची भीती वाटत नाही. पण, हिंदुंची भीती वाटते, कारण हिंदूच हिंदुंच्या विरोधात असतात. आपल्या परंपरा व संस्कारांची टिंगल करणारे हिंदुच असतात.
पोंक्षे म्हणाले, सावरकर म्हणत, अतिशय तळागाळापर्यंत गांधींजींनी स्वातंत्र्य हा शब्द पोहोचवला म्हणून आम्हाला क्रांती करणे सोपे गेले. तर गांधीजी म्हणत, या देशावर येणाऱ्या संकटाची चाहूल जर सर्वात आधी कोणाला लागत असेल तर तो माणूस आहे विनायक दामोदर सावरकर. सावरकरांची या देशाला किंमत नाही. पण, जरी किंमत नसली तरी सूर्य हा सूर्य असतो. त्याला कुणी झाकोळू शकत नाही. सावरकरांना कितीही बदनाम केले तरी सावरकर विचार संपवू शकले नाहीत, असे यावेळी सांगली संस्थानचे अधिपती विजयसिंहराजे पटवर्धन यांच्यासह सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावरकर, आंबेडकर यांचे कुणी ऐकले नाही-
देश स्वतंत्र झाला तरी देशाची फाळणी झाली. त्यावेळी तात्याराव सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की, जोपर्यंत तिकडचा शेवटचा हिंदू इकडे येत नाही आणि इथला मुस्लिम तिकडे जात नाही तोवर फाळणी यशस्वी होणार नाही. पण, त्यांचे कुणी एकले नाही, असे पौंक्षे म्हणाले.