विटा : करंजे (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीत सन २०१८ ते २०२० दरम्यान ग्रामसेवक व सरपंचांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असून, याची चौकशी करून ग्रामसेवकावर निलंबनाची, तर सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
सूर्यवंशी म्हणाले, करंजे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्रीमंत शिंदे यांनी केलेली कामे, खर्च याची माहिती घेतली असता त्यात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. माहितीच्या अधिकाराखाली त्यांनीच दिलेल्या माहितीत बोगस रोजगार, विनापरवाना मुरुमीकरण केल्याचे दिसत आहे. त्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांच्या नावे खर्च केला आहे, ती नावे आसपासच्या गावातील नावे खर्च टाकला आहे. त्यात अनेक नावे चुकीची व खोटी असल्याचे लक्षात येत आहे. दि. १७ जुलै २०२० रोजी लॉकडाऊनमुळे बंदमध्ये सर्व प्रशिक्षण संस्थांचे काम ठप्प झाले असतानाही सरपंच व ग्रामसेवक यांनी महिलांना ब्युटी पार्लर प्रशिक्षण दिल्याचे बोगस व खोटे दर्शवून एक लाख रुपये खर्च केले आहेत. त्याचबरोबर या खर्चात काही पत्रकारांच्या नावेही रस्ता दुरुस्तीची बिले देऊन खर्च दाखविण्यात आला आहे. याची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.