शरद जाधवसांगली : कुणीही यावे आणि सांगलीकरांना फसवून जावे, असेच काहीतरी सध्या सुरू आहे. नेटवर्क मार्केटिंग केल्यावर त्यांना दामदुप्पट झाल्यानंतर आता शेअर मार्केटच्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक सध्या समोर येत आहे. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तपास करीत सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी यापूर्वी ग्राहकांना फसवून परागंदा झालेल्या कंपन्यांवर कारवाई कधी? हा सवाल कायम आहे.जे शक्य नाही असे आमिष दाखवून सर्वसामान्यांच्याच खिशाला चाट लावूनही कंपन्यांवर विश्वास ठेवण्याचे प्रमाण अद्यापही कायम आहे. त्यामुळेच अनेक प्रकारे नागरिकांना गंडा घातला गेला आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यावर कारवाई सुरू केली आहे. मोठ्या रकमा असलेले गुंतवणूकदार तक्रारीसाठी पुढे येत असले तरी कमी रक्कम असलेले शांतच बसत असल्याने फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे फावले आहे.
या कंपन्यांतील गुंतवणुकीचे काय?जिल्ह्यातून गुंतवणूक करणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक झाली होती. गुंतवणूकदारांच्या पैशांवर या कंपन्यांनी स्थावर मिळकतीही घेतल्या होत्या. या कंपन्यांच्या व्यवहारांवर निर्बंध असले तरी ग्राहकांना अद्यापही परतावा मिळण्यात अडचणी आहेत. अनेकांचे अर्ज प्रलंबित असल्याने व काही कंपन्यांवर न्यायालयात खटला चालू असल्याने पैशांचा परतावा मिळण्यात अडचणी आहेत.
सावध रहा, फसवणूक टाळा
बँकेत पैसे ठेवून त्यावर कमी व्याज घेण्यापेक्षा जादा रक्कम मिळेल या अपेक्षेने अनेकजण आपली आयुष्यभराची जमापुंजी अशा कंपन्यांमध्ये गुंतवतात. त्या कंपन्यांची अथवा संचालकांची कोणतीही माहिती न घेताच हा व्यवहार होतो आणि एकदा कंपनीने गाशा गुंडाळला की पश्चात्ताप करण्याची वेळ येत असल्याने गुंतवणूकदारांनीही सर्व ती चौकशी करूनच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
शेअर बाजाराचे नवे रुपडे
यापूर्वी जिल्ह्यात पर्ल्स, कल्पवृक्ष, मैत्रेय या कंपन्यांकडून जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक झाली आहे. असे प्रकार काही वर्षे थांबले होते. शेअर मार्केटच्या माध्यमातून पुन्हा ते सुरू झाले आहेत. कडकनाथ कोंबडी पालनातूनही फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. यासह गादी, चेन मार्केटिंगसह अनेक मार्गांनी गंडा घालण्यात आला आहे.