सांगली : येथील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमध्ये रोहयोच्या कामांवर चक्क मृत व्यक्ति काम करीत असल्याच्या नोंदी झाल्या होत्या. पुराव्यानिशी याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर प्रांतांच्या स्तरावर रोहयोवर काम करणाऱ्या भुतांची चौकशी सुरू करण्यात आली होती. ही चौकशी रेंगाळल्याने अनेकांच्या मनात संशयाचे भूत निर्माण झाले आहे.
पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे रोजगार हमी योजनेत सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार गावातील गणेश शिंदे, शिवाजी गडदे, मनोजकुमार लोटे व अन्य ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
त्यांनी तक्रारीत म्हटले होते की, ब्रह्मनाळ येथे रोजगार हमी योजनेत १ कोटी २३ लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. बोगस जॉब कार्ड, बोगस व्यक्तींच्या आधाराने हा घोटाळा साकारला आहे. खासगी नोकरदार, शिक्षक, सोसायटी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षणासाठी परगावी गेलेले विद्यार्थी इतकेच नव्हे तर मृत लोकांची नावेसुद्धा जॉब कार्डवर नोंदवून कागदपत्रे रंगविण्यात आली आहेत.
लग्नादिवशीच वधुही कामावर असल्याचे नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. म्हणजेच बोगस नोंदीचा कळस गाठून ही कामे करण्यात आल्याने हे प्रकरण संपूर्ण जिल्हाभर लक्षवेधी ठरले आहे.
मृत लोकांची भुते कामावर येतात, का असा संतप्त सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. हे प्रकरण प्रांतांच्या स्तरावरच तपासले जात आहे. गेल्या अनेक महिन्यात याप्रकरणात कोणतीही प्रगती झाली नाही. त्यामुळे चौकशीबद्दलच आता संशयाचे भूत तक्रारदारांच्या मनात निर्माण झाले आहे.