अविनाश कोळी
सांगली,12 : येथील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमध्ये रोहयोच्या कामांवर चक्क मृत व्यक्ति काम करीत असल्याच्या नोंदी झाल्या आहेत. पुराव्यानिशी याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर आता प्रांतांच्या स्तरावर रोहयोवर काम करणाऱ्या भुतांची चौकशी सुरू झाली आहे.
पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे रोजगार हमी योजनेत सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार गावातील गणेश शिंदे, शिवाजी गडदे, मनोजकुमार लोटे व अन्य ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ब्रह्मनाळ येथे रोजगार हमी योजनेत १ कोटी २३ लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. बोगस जॉब कार्ड, बोगस व्यक्तींच्या आधाराने हा घोटाळा साकारला आहे.
खासगी नोकरदार, शिक्षक, सोसायटी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षणासाठी परगावी गेलेले विद्यार्थी इतकेच नव्हे तर मृत लोकांची नावेसुद्धा जॉब कार्डवर नोंदवून कागदपत्रे रंगविण्यात आली आहेत.
मृत लोकांची भुते कामावर येतात, का असा संतप्त सवालही त्यांनी अधिकाºयांना केला आहे. जिल्हाधिकाºयांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून आता या भुतांचे प्रकरण प्रांतांच्या स्तरावरच तपासले जात आहे.
या प्रकरणाच्या सुनावण्या घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ही चौकशी रेंगाळण्याची शक्यता असल्याने तक्रारदारांनी याचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसीलदार, प्रांताधिकारी, रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यासह तक्रार करण्यात आली आहे.
लोकायुक्तांकडेही चौकशीची मागणी केली आहे. लग्नादिवशीच वधुही कामावर असल्याचे नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. म्हणजेच बोगस नोंदीचा कळस गाठून ही कामे करण्यात आल्याने हे प्रकरण संपूर्ण जिल्हाभर लक्षवेधी ठरले आहे.
असा झाला घोटाळा !४१ लाख रुपयांच्या मुरुमाची गौण खनिजची कोणतीही पावती नाही. सुखवाडी थडे ते ब्रह्मनाळ व वखार ते संदीप गावडे हा एकच रस्ता दोन वेळा केला आहे. इतर २१ रस्त्यांच्या कामातही असेच घोटाळे केले आहेत. या रस्त्यांची गुण नियंत्रकांकडून कोणत्याही प्रकाराची पाहणी झालेली नाही. कमी मुरुम टाकून कामे निकृष्ट केली आहेत.
ब्रह्मनाळमधील बजेट वापरुन धनगाव, भिलवडी, खंडोबाचीवाडी, वसगडे येथील कामे दाखवून रक्कम उचलली गेली आहे. यासाठी मजूर दुसºया गावांमध्ये दाखविले आहेत. यासाठी संबंधित गावांकडून मागणी अर्ज व काम सुरू असलेल्या गावांचा परवानगी अर्ज कुठेच दाखविला गेला नाही.
प्रत्येक रस्त्यासाठी समान निधी खर्च केल्याचे दाखविले आहे. १८ लाख मजूर व ६ लाख मटेरियलसाठी दाखविण्यात आले आहेत. वास्तविक पाहता, प्रत्येक रस्त्याचे बजेट कामानुसार वेगवेगळे असणे गरजेचे आहे. पण समान बजेटमुळे या प्रकरणात घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते, असे तक्रारदार गावकºयांचे म्हणणे आहे.