लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहर विकास आघाडीचे नेते, माजी आमदार दिवंगत विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची येथे एका कार्यक्रमात भेट झाली. यावेळी पाटील यांनी शिंदे यांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे सध्या भाजपमध्ये असलेले शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील सुरुवातीला एकमेकांचे विरोधक होते. मात्र, नव्वदच्या दशकानंतर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शिंदे यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. आष्टा नगरपालिकेची सूत्रेही शिंदे यांच्याकडे देण्यात आली, तर त्यांचे पुत्र वैभव यांना पंचायत समिती देण्यात आली.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी वैभव शिंदे यांना देण्यात आली. त्यांच्या विरोधात तत्कालीन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर व अपक्ष म्हणून संभाजी कचरे रिंगणात होते. कचरे विजयी झाले. हा पराभव जिव्हारी लागलेल्या शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी आष्टा येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर करून आणले. दरम्यान, विलासराव शिंदे यांचे निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी जयंत पाटील यांनी, ‘वैभव व विशाल शिंदे आमचेच आहेत, त्यांच्या पाठीशी आहोत’, असे सांगितले होते. त्यामुळे वैभव शिंदे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असे चित्र निर्माण झाले. मात्र, त्यानंतर शांतता होती.
दरम्यान, आता जयंत पाटील यांनी आष्टा शहरातील बूथ कमिटी अध्यक्ष, पदाधिकारी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वैभव शिंदे उपस्थित नव्हते. तथापि, रविवारी शिंदे व पाटील यांची तांदूळवाडी येथील कार्यक्रमात दिलखुलास चर्चा रंगली. यावेळी पाटील यांनी शिंदे यांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे शिंदे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार का, याची चर्चा रंगली आहे.
कोट
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची एका कार्यक्रमात भेट झाली. या भेटीत राजकीय चर्चाही झाली. पाटील यांनी राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. आष्टा शहर विकास आघाडी व विलासराव शिंदेप्रेमी कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य वेळी निर्णय घेऊ.
- वैभव शिंदे, आष्टा शहर विकास आघाडी