लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत तालुक्यात आजअखेर केवळ २० टक्के लसीकरण झाले आहे. तालुक्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते अत्यल्प कमी आहे. गाव पातळीवरील ग्राम समित्यांना यात सहभागी करून घ्यावे. लसीकरणाचे उद्दिष्ट त्यांना ठरवून द्यावे. सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेण्यासाठी प्राधान्यक्रम द्यावा, अशा सूचना कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केल्या.
जत पंचायत समिती सभागृहात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कदम म्हणाले, सध्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत आपण जात आहोत. यामध्ये जनतेसह सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. तालुक्यातील वर्ग एक, दोन व तीनच्या ज्या रिक्त जागा असतील त्या त्वरित भरून घेण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाईल आणि इतर बाबींची कमतरता असेल तर ती जिल्हा नियोजन समितीमधून भरून काढू.
२०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग प्रत्येक दहा लोकांना होत होता; परंतु सन २०२१ मध्ये सुरू असलेल्या कोरोनाचा संसर्ग २५ लोकांना होत आहे. ४५ वर्षांवरील व ४५ वर्षांच्या आतील ग्रामीण आणि शहरी भागाची विभागणी करून लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरण करण्यात यावे. प्रबोधन, प्रचार करण्यासाठी शासनाने भर द्यावा, सध्या गंभीर परिस्थिती नसली तरी भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरूनच उपाययोजना करावी.
माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्याचा अतिरिक्त ताण जत ग्रामीण रुग्णालयावर पडत आहे अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी आढावा बैठकीत केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी तात्काळ फोनवर बोलून तेथील रिक्त जागा भरण्याची सूचना मंत्री विश्वजित कदम यांनी या बैठकीत केली. सध्या आरोग्य कर्मचारी व अधिकारी अहोरात्र काम करीत आहेत. काही कामचुकार अधिकाऱ्यांसंदर्भात तक्रारी येत आहेत; परंतु त्या तक्रारीवर बोट ठेवून त्यांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांच्याकडून काम करून घेणे सध्या गरजेचे आहे, असे मत आमदार विक्रम सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, अपर तहसीलदार एच.आर. म्हेत्रे, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर आदी यावेळी उपस्थित होते.