सांगली : शहरातील खणभाग परिसरात आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. शहर पाेलिसांनी केलेल्या कारवाईत एजंटासह सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २८ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संग्राम प्रल्हाद शिंदे (रा. मदिना मस्जिदसमोर खणभाग) या एजंटासह
दीपक प्रकाश शिंदे, प्रशांत प्रकाश शिंदे (दोघेही रा. पार्वती कॉम्प्लेक्स वखारभाग), संतोष गजानन रसाळ (रा. खामकर गल्ली खणभाग),
अविनाश नंदकुमार साळसकर (रा. लाळगे गल्ली, खणभाग),
प्रदीप दशरथ भोर (शेवाळे गल्ली, खणभाग, सांगली) या सट्टा लावणाऱ्या ग्राहकांनाही अटक करण्यात आली आहे.
शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सदस्यांना रविवारी माहिती मिळाली की, शहरातील मदिना मस्जिदजवळ असणाऱ्या चिकन सेंटरमध्ये आयपीएल सामन्यावर बेटिंग घेतले जात आहे. पथकाने याठिकाणी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. यावेळी संशयित शिंदे हा एजंट म्हणून, तर इतर ग्राहक म्हणून तिथे बेटिंग लावत होते.
त्यांच्याकडून एकूण जुगारासाठी वापरलेले पाच मोबाइल व जुगाराचे साहित्य, असे २८ हजार ३४५ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. पाेलिसांनी केलेल्या तपासात या बेटिंग अड्ड्याचा बुकीमालक जमीर मकानदार (रा. रेल्वेस्टेशनजवळ सांगली) हा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप जाधव, विक्रम खोत, अक्षय कांबळे, महेश गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.