सांगली : मागील संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमताने केलेल्या गैरकारभारामुळे बँकेच्या लेखापरीक्षणात पाचशे कोटी रुपयांची अनियमितता दिसून आली आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी व तक्रार सक्तवसुली संचालनालय (ईडी), रिझर्व्ह बँक व नाबार्डकडे केली आहे, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, बँकेत पाच धक्कादायक कर्ज प्रकरणे लेखापरीक्षणातून समोर आली आहे. यामध्ये स्वप्नपूर्ती शुगरचे प्रकरण आघाडीवर आहे. ही संस्था केवळ कागदोपत्री अस्तित्वात आहे. ३१ मार्च २०२० रोजी या संस्थेने २३ कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव दिला. त्याचदिवशी संचालकांनी त्यावर सह्या केल्या, त्याच दिवशी मंजुरी देऊन पैसे अदा केले. आश्चर्य म्हणजे कोणत्याही तारणाशिवाय हे कर्ज देण्यात आले. कर्ज मिळताच स्वप्नपूर्ती शुगरकडून ही रक्कम वसंतदादा कारखान्यास वर्ग झाली. चार महिन्यांनी वसंतदादा कारखान्याचीच मालमत्ता बँकेला तारण ठेवण्यात आली.
केन ॲग्रोला ५० कोटी रुपयांचे कर्ज देताना साखर तारण घेतली होती; मात्र जागेवर कोणतीही साखर नसल्याचे निरीक्षण लेखापरीक्षकांनी नोंदविले आहे. त्याचबरोबर एसजीए व एसजीझेड या दोन संस्थांना ७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले. मात्र, या कर्जदारांची कागदपत्रेच बँकेकडे नाहीत. ही रक्कम नंतर यशवंत व तासगाव कारखान्याकडे वर्ग झाल्याबाबत चौकशी झाली नाही. याशिवाय जप्त केलेले कारखाने बँकेने विकत घेतले. त्यातून बँकेला कोणताही फायदा झाला नाही. कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने हा व्यवहार झाला आहे. यामध्ये महांकाली, माणगंगा कारखाना, शेतकरी-विणकरी, प्रतिबिंब या संस्थांचा समावेश आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी हे यास जबाबदार आहेत, असे ते म्हणाले.
चौकट
ज्यांनी सहकार उभारला, त्यांचे वारसदारच घोटाळ्यात
जिल्ह्यात वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांनी सहकार उभारला व वाढविला; मात्र त्यांच्याच वारसदारांकडून सहकार बुडविण्याचे काम सुरू असल्याची टीका सावंत यांनी केली.
चौकट
लेखापरीक्षणाचे पुरावे
तपास यंत्रणांकडे तक्रार करताना बँकेच्या लेखापरीक्षण अहवालाचा दाखला दिला आहे. पुरावे म्हणून ही कागदपत्रे पुरेशी आहेत, असे सावंत म्हणाले.