शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पाण्याचा वापर जपून करावा किंवा पाण्याला संपत्ती मानावी, ही धारणा अनेकांमध्ये नसतेच. शेतीसाठी जपून पाणी वापरण्याऐवजी ‘डुबूक’ पध्दतीला प्राधान्य देण्यात येते. मात्र, या पाण्याचे मोल जाणून संपूर्ण गाव ठिंबक सिंचनाने युक्त करण्याचे शिवधनुष्य तासगाव तालुक्यातील पुणदी गावाने उचलले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ८५ टक्के ठिबक सिंचन पूर्ण झाले आहे. संपूर्ण गावाने शेतीसाठी हा पर्याय स्वीकारल्याने दुष्काळमुक्तीचा आदर्श निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सिंचन योजना कार्यरत असल्या तरी, त्यांची वाढत चाललेली थकबाकी आणि पाण्याचे नियोजन कोलमडत असल्याने शेतकऱ्यांना उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची वेळ येते. स्वत:च्या मौल्यवान ऐवजाचे आपण जसे रक्षण करतो, तशी मानसिकता पाणी वापरताना कोणामध्ये आढळून येत नाही. मात्र, पुणदी गावाने पाण्याचे मोल जाणले आहे. येथे ज्यांची शेती ठिबकवर नाही, त्यांना पाणी व ग्रामपंचायतीच्या सुविधा मिळणार नाहीत, असा ठरावच सर्वानुमते संमत करण्यात आला आहे. आजवर या गावातील ८५ टक्के शेतकºयांनी ठिबक केले असून, येत्या काही दिवसात गाव १०० टक्के ठिबकयुक्त होण्याकडे वाटचाल सुरू आहे.तासगाव तालुक्यातील पुणदी गावात तीन हजार एकर शेतीक्षेत्र आहे. गावात ५९ दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव आहे. तरीही गावात टंचाई निर्माण होत असे. तत्कालीन उपसरपंच व तासगाव बाजार समितीचे विद्यमान सभापती रवींद्र पाटील यांनी दुष्काळ हटविण्यासाठी ग्रामसभेत, संपूर्ण गाव ठिबक सिंचनयुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला. गावकºयांनी त्याला पाठिंबा दिला. जो ठिबक सिंचन करणार नाही, त्यास तलावातून पाणी न देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली. ही मात्रा चांगलीच लागू पडली आणि अखेर संपूर्ण शिवार ठिबक सिंचनाकडे वळले. परिणामी पाण्याचा बेसुमार वापर टळला. आता गावात एकही पीक पाटाच्या पाण्यावर घेतले जात नाही. सध्याच्या कडक उन्हाळ्यातही गावात हिरवाई टिकून आहे. ताकारी योजनेतून तलाव भरण्यात येतो. विशेष म्हणजे तालुक्यातील सर्वात जास्त पाणीसाठा पुणदी तलावात आहे.
पुणदीची वाटचाल शंभर टक्के ठिबक सिंचनाकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:01 AM