सांगली : जलसंपदा विभागाने २०१९-२० या वर्षाचे खात्यांतर्गत पुरस्कार जाहीर केले असून, सांगली पाटबंधारे विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेचे पाणी दुष्काळी तालुक्यात पोहोचविण्यात अधिकाऱ्यांनी चांगले प्रयत्न केले होते. या कामगिरीबद्दल शासनाने पुरस्कार जाहीर केला आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याच वर्षासाठी कार्यकारी अभियंता सचिन पवार यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार जाहीर झाला आहे.सांगली पाटबंधारे विभागाच्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू करून दुष्काळी तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे. यामध्ये तत्कालीन अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले, मिलिंद नाईक आणि विद्यमान अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी योग्य नियोजन करून सिंचन योजनांच्या कामांना गती देऊन दुष्काळग्रस्तांना पाणी उपलब्ध करून दिले.या योजना प्रभावीपणे राबवणे, नव्याने क्षेत्र सिंचनाखाली आणणे, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वसुलीचा टक्का वाढवणे आदी कामांत सांगली पाटबंधारे विभागाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. बंदिस्त पाइपद्वारे पाणीपुरवठ्याची नवीन व्यवस्था उभारण्याचे महाकाय कामही या काळात सुरू केले. त्याचे उत्तम नियोजन करत विक्रमी सिंचन निर्मिती, विकेंद्रित पाणीसाठे व त्यातून सूक्ष्म सिंचनात यश मिळाले. सांगली विभागाला सांघिक पुरस्कार जाहीर झाला. कार्यकारी अभियंता सचिन पवार यांना वैयक्तिक उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर झाला.
सचिन पवार यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कारकार्यकारी अभियंता गटामध्ये सचिन कुंडलिक पवार यांची वैयक्तिक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २०१९चा सांघिक पुरस्कार सांगली पाटबंधारे मंडळास जाहीर असून, त्यामध्येही त्यांचा समावेश आहे. पवार हे सध्या म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक दोन येथे कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी संपादन करून भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयटीआय) दिल्ली येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ताकारी, म्हैसाळ व टेंभू या तीनही उपसा सिंचन योजनांच्या कामात त्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. टेंभू योजनेचा सांगोला कालवा १९ ते ५० हा टप्पा २०१८-१९ मध्ये पूर्ण केला. विसापूर-पुणदी उपसा योजनांवरील लाभक्षेत्रामध्ये बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची काम पूर्ण करण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.