सांगली : महिनाभरासाठी आयर्विन पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला. आहे. हा पूल पादचारी, दुचाकी वाहनांसाठी खुला करण्याची मागणी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकारी चौधरी यांनी त्याला अनुकूलता दर्शविली असून, दोन दिवसांत हा पूल खुला होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आयर्विन पुलाच्या दुरुस्तीचे काम २३ फेब्रुवारीपासून सुरू केले आहे. त्यामुळे आयर्विन पूल रहदारीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीवाडी व पश्चिम भागातील नागरिकांना सांगली शहरात प्रवेश करण्यासाठी शहराबाहेरील व महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना किमान ४ ते ५ कि.मी. अंतराचा वेढा घालून शहरामध्ये प्रवेश करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला, विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार नागरिकांचा समावेश आहे. मात्र, सध्या हा पूल रहदारीस बंद केल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या नागरिकांनी शहराचा प्रथम नागरिक या नात्याने महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे सदरचा पूल रहदारीसाठी तातडीने खुला करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार महापौर सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना आयर्विन पूल रहदारीसाठी खुला करण्याची विनंती केली. नागरिकांची होणारी गैरसोयी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सदरचा पूल पुढील दोन दिवसांत केवळ पादचारी, सायकलस्वार व दुचाकी इत्यादींच्या रहदारीसाठी खुला करण्यास मंजुरी दिली असून, पुढील दोन दिवसांत हा पूल नागरिकांच्या रहदारीस खुला होणार आहे. याबाबत नगरसेवक अजिंक्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले होते.