सांगली : प्रस्तावित बेंगलोर- दिल्ली राजधानी एक्सप्रेसला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. मिरज वगळता महाराष्ट्रातील एकाही स्थानकावर ही गाडी थांबणार नाही. त्यामुळे राज्यातील प्रवाशांवर अन्याय होणार आहे. उलट कर्नाटकातील आठ स्थानकावर ही गाडी थांबणार आहे. राजधानी एक्सप्रेस केवळ कर्नाटकातील प्रवाशांसाठी आहे का? असा सवाल नागरिक जागृती मंचने उपस्थित केला आहे.
नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले की, रेल्वे विभागाकडून अनेक नव्या गाड्या सुरू करण्यात येत आहेत. पण या गाड्यांना सांगली स्थानकावर थांबा देण्यात येत नाही. याविरोधात अनेकदा पत्रव्यवहार, आंदोलने केले. त्यातून काही गाड्यांना सांगली स्थानकावर थांबा देण्यात आला. आता प्रस्तावित बेंगलोर-दिल्ली राजधानी एक्सप्रेस गाडीबाबतही सांगलीकरावर अन्याय केला जात आहे. या एक्सप्रेसला पुणे स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. ही एक्सप्रेस कर्नाटकातील बेंगलोर, तुमकूर, आर्सिकेरी, बिरूर, दावणगिरी, हुबळी, धारवाड, बेळगाव या आठ स्थानकावर थांबणार आहे. महाराष्ट्रात मात्र मिरजेलाच एक थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यावर अन्याय झाला आहे.
कर्नाटकात हुबळी व धारवाड या एकाच महापालिकेच्या दोन स्टेशनवर थांबा आहे. महाराष्ट्रात मिरज येथे स्टॉप आहे. पण मिरज हा कर्नाटक सीमेवरील स्टेशन असल्यामुळे त्याचा फायदा कर्नाटकातील प्रवाशांनाच होतो. मिरजेसह सांगलीला थांबा दिल्यास पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना फायदा होणार आहे. एकूणच ही गाडी फक्त कर्नाटकच्या प्रवाशांसाठी आहे की काय, अशी शंका येते.
सांगली जिल्ह्यातून जाणारा पुणे-लोंढा-बेंगलोर दुहेरी विद्युत सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग झाला आहे. त्यावर पाच हजार कोटी खर्च केले आहेत. या रेल्वे मार्गासाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. ही गाडी सांगली स्थानकावर थांबणारच नसेल तर दुहेरी रेल्वे मार्गाचा जिल्ह्याला फायदा काय, असा सवालही त्यांनी केला.