Sangli Lok Sabha Constituency: विशाल पाटील बंडखोरीच्या तयारीत?; कार्यकर्त्यांना 'मै हू ना'ची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 12:10 PM2024-04-09T12:10:35+5:302024-04-09T12:11:06+5:30
दोन अर्ज भरणार, कार्यकर्त्यांना 'मै हू ना'ची आठवण
सांगली : महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीनंतरही सांगलीच्या उमेदवारीचा तिढा सुटत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षातील जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. म्हणूनच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील अपक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून असे दोन अर्ज भरणार आहेत. पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तर बंडखोरी होणार हे निश्चित आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेसह अन्य छोटे-मोठे मित्रपक्ष मिळून महाविकास आघाडी झाली आहे. या आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या उद्धव सेनेकडून सांगली लोकसभेसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यावरून काँग्रेस आणि उद्धव सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम, उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी मुंबई ते दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेऊनही सांगली लोकसभेचा तिढा सुटला नाही.
यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, विशाल पाटील यांच्यावर बंड करण्यासाठी दबाव वाढला आहे. यातूनच विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक, नाही तर बंड करण्याची तयारी ठेवली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांना काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज भरण्याची सूचना दिली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला आणि सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली तर उत्तमच आहे. नाही मिळाली तर विशाल पाटील बंडखोरी करणार हे निश्चित झाले आहे, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
कार्यकर्त्यांना 'मै हू ना'ची आठवण
माजीमंत्री स्वर्गीय मदन पाटील यांनी 'मै हू ना' म्हणत २००४ मध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करुन विजय खेचून आणला होता. याप्रमाणेच विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करावी, आम्ही विजय खेचून आणू, अशी कार्यकर्त्यांनी पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.