इस्लामपूर : येथील सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी रमेश परिसनाथ शेटे यांच्यावर गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी विषारी द्रव टोचून जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. ‘मॉर्निंग वॉक’वेळी घडलेल्या ‘बायो वॉर’ प्रकारातील या हल्ल्यामुळे शेटे यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांच्यावर कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरूआहेत. रमेश शेटे (वय ५७, रा. पारस प्लाझा, यल्लमा चौक, इस्लामपूर) सहकाऱ्यांसमवेत कामेरी रस्त्यावरील दत्त टेकडी परिसरात दररोज पहाटे फिरायला जातात. गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. पाच मिनिटांत ते तांबट गल्लीतील लिपारे कॉर्नरजवळ आले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांना बसस्थानकाकडे जाणारा रस्ता विचारला आणि या बोलण्याच्या अवधीत एकाने त्यांच्या मानेवर सुईसारखी टोकदार वस्तू टोचली. या घटनेने बिथरलेल्या शेटे यांनी शिवीगाळ करीत त्यांचा पाठलाग केला. पहाटेची वेळ, धुक्याचे वातावरण यामुळे त्यांना दुचाकीवरील हल्लेखोर आणि वाहनांचे क्रमांक पाहता आले नाहीत. हल्लेखोरांनी दुचाकीवरून पलायन केले. शेटे यांना मानेवर कशाने तरी टोचल्याची जाणीव झाली. त्यानंतर ते तसेच सहकाऱ्यांसवेत दत्त टेकडी पसिरात फिरण्यास गेले. सहकाऱ्यांना हा प्रकार सांगितला, तसेच वेदनाशामक गोळी घेतली. त्यानंतर दत्त टेकडीवरून ते फिरून आले. घरी आल्यावर त्यांना उलटीचा त्रास सुरू झाला. जीभ जड वाटू लागली. अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथे तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्याची सूचना केली. त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांमध्ये झाली नव्हती. (वार्ताहर) रमेश शेटे यांच्यावर झालेल्या विषारी हल्ल्यातील विष ‘न्युरोटॉक्सीन’ या प्रकारातील आहे. ‘न्युरोटॉक्सीन’ हा घटक नागाच्या विषात असतो. ‘बोटोलिझम’ या बॅक्टेरियापासून अती जहाल विष तयार होत असते. शेटेंवरील हल्ला हा दोन प्रकारांतील असू शकतो. सुईच्या टोकावरचे विषदेखील जीवघेणे ठरू शकते. - प्रा. संतोष परीट, न्यू कॉलेज, कोल्हापूर.
इस्लामपुरात सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला
By admin | Published: December 11, 2015 12:46 AM