युनूस शेख - इस्लामपूर -इस्लामपूर शहरासह पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे, शस्त्रे, वन्यजीवांची तस्करी, घरफोड्या, वाटमाऱ्या, महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट, वाहन चोऱ्या अशा गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलीस ठाण्यात ११ अधिकारी असताना चोरट्यांनी उच्छाद मांडून त्यांच्या कार्यक्षमतेचे धिंडवडे काढले आहेत. तपासाच्या पातळीवर तर त्यांची कामगिरी शून्य आहे. इथे पोलीस अधिकाऱ्यांची निव्वळ खोगीर भरती झाली आहे. त्यामुळे इथे खमक्या अधिकाऱ्याची गरज आहे.सध्या इस्लामपूर पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, चार सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सहा पोलीस उपनिरीक्षक असा ११ अधिकाऱ्यांचा फौजफाटा आहे. यांच्याबरोबर फक्त ५५ ते ६0 कर्मचारी राबत आहेत. इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तालुक्यातील ४0 गावे आहेत. जवळपास दोन लाख लोकसंख्येचा भार या तोकड्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे इथे अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यापेक्षा कर्तव्यकठोर अधिकारी देऊन कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे गजरेचे आहे. या गोष्टीची दखल नव्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी घ्यावी.गेल्या दोन वर्षांतील या पोलीस ठाण्याची तपासातील कामगिरी पाहता त्यांची कार्यक्षमता लक्षात येते. शहर व परिसरात अवैध व्यवसाय जोमात आहेत. शस्त्र तस्करी, वन्यजीवांची तस्करी, महिलांचे दागिने हातोहात लूटणाऱ्या धूम टोळ्या, वाहनांची चोरी, घरफोड्या, वाटमाऱ्या अशा पध्दतीच्या गुन्हेगारीने कळस गाठला असतानाही इथले पोलीस श्वानाच्या पाठीमागे पळण्यापर्यंतच चोरट्यांचा माग काढतात. पुढे हाती काही लागत नाही. गेल्या दोन वर्षात इथल्या अधिकाऱ्यांनी एकाही टोळीचा अथवा चोरीचा छडा लावलेला नाही. यावरुन त्यांना गुन्हे तपास व प्रगटीकरणात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. बोरगाव, ताकारी, कासेगाव परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत धुमाकूळ घालत पोलिसांना आव्हान दिले आहे. किरकोळ चोऱ्यांचा छडा लावू न शकणाऱ्या इथल्या पोलिसांना हे आव्हान पेलवणार का? याची सांशकता आहे. मंडलिक, आवाड पॅटर्न राबविण्याची गरजइस्लामपूर पोलीस उपविभागात गुन्हेगारांच्या उरात धडकी भरवण्याची कामगिरी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय मंडलिक, सारंग आवाड यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी केली होती. गुन्हा घडल्यास फक्त २४ ते ४८ तासांत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गुन्हेगारांना जेरबंद करण्याची खासीयत मंडलिक यांच्याकडे होती. त्यांच्या काळात पोलिसांच्या वर्दीचा धाक होता आणि सामान्य नागरिकांकडून वर्दीचा आदरही केला जात होता. सारंग आवाड यांनी तर परफेक्ट आणि सायलेंट पोलिसिंगचा दणका देत अनेकांना हिसका दाखवला होता. रात्री ११ वाजता शहरात शांतता झाली पाहिजे, असा त्यांचा खाक्या होता. त्यामुळे गुन्हेगारीला पायबंद बसला होता. आता पोलिसिंग म्हणजे फक्त वर्दीचा रुबाब, असा समज झाल्याने गुन्हेगारी बोकाळली आहे.
इस्लामपुरात गुन्हेगारीला ऊत!
By admin | Published: June 21, 2015 11:19 PM