लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने कठोर पावले उचलत शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या ९७ जणांची रॅपिड अॅँटिजेन टेस्ट घेतली. त्यामध्ये इस्लामपूर, कामेरी आणि येलूर गावातील प्रत्येकी एकजण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. या तिघांची कामेरी रस्त्यावरील समाजकल्याण इमारतीमधील कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली.
शहरातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी विनाकारण फिरून कोरोनाचा प्रसार करणाऱ्यांची रॅपिड अॅँटिजेन टेस्ट करण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथील आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार पोलीस आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने या कारवाईला सोेमवारपासून सुरुवात केली.
सोमवारी दिवसभरात शहरातील विविध ठिकाणी हे पथक रुग्णवाहिकेसह कार्यरत होते. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची चौकशी करून त्यामध्ये विनाकारण फिरत असल्याचे स्पष्ट झालेल्या ९७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तिघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.