इस्लामपूर : निनाईनगर येथील एक कोटी ९० लाख रुपये खर्चाची पालिकेच्या मालकीची व्यायामशाळा एन. ए. कला, क्रीडा मंडळाकडून ताब्यात घेण्याचे निर्देश नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सोमवारी दिले. ही व्यायामशाळा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या समर्थकांना नाममात्र १०० रुपये भाडेतत्त्वावर दिली होती. या निर्णयातून विकास आघाडीने सभागृहात बहुमत असणाऱ्या राष्ट्रवादीला दुसरा दणका दिला.
नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली. या सभेत विकास आघाडीचे नगरसेवक आक्रमक राहिले, तर पूर्वीच्या सत्ताकाळातील भोंगळ कारभार समोर येत असल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक विश्वास डांगे, शहाजी पाटील, संजय कोरे व्यायामशाळेच्या विषयावर मतदान घ्या किंवा तो रद्दच करून टाका, अशी गळ घालत राहिले. शेवटी सभागृहात कायदेशीर पद्धतीनेच कामकाज चालते याची वारंवार आठवण करून देत नगराध्यक्ष पाटील यांनी वैभव पवार यांची हरकत स्वीकारून पूूर्वी झालेला ठराव बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादीची मतदानाची मागणी फेटाळून लावली.
वैभव पवार यांनी विजयभाऊ पाटील बहुउद्देशीय संस्थेपाठोपाठ नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या निनाईनगरातील मंडळाविरुद्ध हरकतीची सूचना देत व्यायामशाळेची इमारत काढून घेण्याची मागणी केली. विजयभाऊ पाटील संस्थेस इमारत व जागा देताना पालिका अधिनियमाचा भंग करून आर्थिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्या तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी दुसरी हरकत घेतली. त्यावर नगराध्यक्ष पाटील यांनी पालिका अधिनियमाच्या कलम ९६ अन्वये आर्थिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले.
अधिकाऱ्यांकडून महिला प्रतिनिधींना उद्धट भाषेत उत्तरे दिली जातात, आमचा सन्मान ठेवला गेला नाही, तर आम्हाला वेगळे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा नगरसेविका कोमल बनसोडे यांनी दिला. यावेळी नगराध्यक्षांनी असे प्रकार पुन्हा घडल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला.
आनंदराव पवार, विक्रम पाटील, प्रतिभा शिंदे यांनी शहराच्या विविध भागांतील अपुऱ्या पाणी पुरवठ्यावर नाराजी व्यक्त करत ऐन उन्हाळ्यात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करा, अशी मागणी केली. शकील सय्यद, सुनीता सपकाळ यांनी धूरफवारणी होत नाही व आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा झाली नसल्याचे आरोप केले. संजय कोरे यांनी शास्त्रीनगरातील बांधकाम विभागाच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली.
चौकट
शहरासह पालिकेचे नुकसान होत असल्याचा दावा
निनाईनगर येथील एक कोटी ९० लाख रुपये खर्चाची पालिकेच्या मालकीची व्यायामशाळा एन. ए. कला, क्रीडा मंडळाला नाममात्र १०० रुपये भाडेतत्त्वावर दिली होती. याबाबत हरकत येताच नगराध्यक्ष पाटील यांनी आक्रमक होत हा ठराव बेकायदेशीर असल्याचे सांगितले. यामुळे शहराचे आणि पालिकेचे नुकसान होत असल्याने ही व्यायामशाळा पालिकेच्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले.