सांगली : अथणी येथील सराफ विनोद साळुंखे यांना रिव्हॉल्व्हर व चाकूचा धाक दाखवून नऊ किलो चांदी व एक तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये चौघे इस्लामपुरातील आहेत. टोळीचा म्होरक्या इस्लामपूरचा जावई आहे. टोळीकडून चोरीस गेलेले सर्व दागिने जप्त केले आहेत. त्यांची किंमत चार लाख रुपये आहे.अटक केलेल्यांमध्ये सूत्रधार अनिल आनंदा गजरे (वय ३२, रा. गजरे गल्ली, हुपरी, जि. कोल्हापूर), नितीन सुरेश सूर्यवंशी (२४), सचिन वसंत टिकारे (१९, दोघे रा. दत्तनगर कामेरी रस्ता, इस्लामपूर), कपिल कृष्णा पवार (१९) व सूरज अशोक जाधव (१९, दोघे रा. तानाजी चौक, उरुण इस्लामपूर) यांचा समावेश आहे. गजरे हा इस्लामपूरचा जावई आहे. तो हुपरीतील एका सराफाकडे नोकरी करतो. या सराफाकडे कर्नाटकातील सराफ चांदी खरेदीसाठी येत असल्याची त्याला माहिती होती. यातून त्याने साळुंखे यांना लुटण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे.विनोद साळुंखे, त्यांचा भाऊ व चुलता हे तिघे ३१ आॅक्टोबरला हुपरीतून चांदी खरेदी करुन अंकली, मिरजमार्गे अथणीला निघाले होते. त्यावेळी या टोळीने त्यांना अडवून बेदम मारहाण करुन नऊ किलो चांदी, दागिने असा ऐवज लंपास केला. त्यानंतर साळुंखे यांच्या भावाचे अपहरण केले. भावाला त्यांनी धरणगुत्ती (ता. शिराळा) येथे सोडले होते. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल सागर पाटील यांना लुटीतील संशयित इस्लामपुरातील असल्याचे समजले. पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, गुन्हे अन्वेषणचे विश्वनाथ घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा छडा लावला. लूटमारीनंतर संशयितांनी दागिन्यांची समान वाटणी केली होती. सागर पाटील यांच्या तपासाचे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी कौतुक करुन त्यांना दहा हजारांचे रोख बक्षीस दिले. (प्रतिनिधी)मोटार विशाळगडच्या घाटात संशयित गजरे याने लुटीसाठी इस्लामपुरातील नातेवाईकाची मोटार (क्र. एमएच ०४ बीएच ५१५३) घेतली होती. लूटमारीचे काम फत्ते झाल्यानंतर संशयित इस्लामपूरला गेले. तिथे त्यांनी दागिन्यांची वाटणी केली. दुसऱ्यादिवशी त्यांनी ही मोटार विशाळगडला जाऊन घाटात फेकून दिली होती. पोलिसांनी ही मोटार जप्त केली आहे.
इस्लामपूरच्या टोळीस अटक
By admin | Published: November 07, 2014 10:58 PM