लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी घेतला. सांगली दौऱ्यावर आल्यानंतर देसाई यांनी इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील सत्रे चौकात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून बंदोबस्ताची माहिती घेतली.
यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी देसाई यांना पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आणि संचारबंदीच्या उपाययोजनांची माहिती दिली.
गृहराज्यमंत्री देसाई यांनी पुण्या-मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांबाबत काय दक्षता घेतली जाते, याची विचारणा केली. वाहतूक कोंडीबाबत व्यवस्थापनाच्या सूचना केल्या. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाकडून विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अॅँटिजेन टेस्ट केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी शहरातील व मुख्य मार्गावरील वाहतूक व्यवस्था आणि भाजीपाला विक्रीसाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, डॉ. साकेत पाटील उपस्थित होते.