अशोक पाटील --इस्लामपूर -आगामी नगरपालिका निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मी माझ्या वैयक्तिक भावनेतून मांडत आहे, असे मत पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. याउलट राष्ट्रवादीतील गट एकत्र करा, नंतर बिनविरोधची भाषा बोला, असा सल्ला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक यांनी दिला. येथे सत्ताधारी राष्ट्रवादीविरोधात सर्व पक्ष एकत्र आले, तर विरोधी गटाची ताकद वाढते. जर विरोधकांत एकी नसेल, तर राष्ट्रवादीचे फावते. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि विरोधी गटातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. सभागृहात विरोधी पक्षनेते विजय कुंभार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार आणि कपिल ओसवाल हे तीनच नगरसेवक विरोधी बाकावर आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी केवळ कागदोपत्री विरोध दर्शविला आहे. त्यामुळेच वर्षभरापासून पक्षप्रतोद पाटील यांनी, आगामी निवडणुकीत विरोधक औषधालाही ठेवणार नाही, अशी भाषा सुरू केली होती. आता मात्र त्यांनी भूमिका बदलली आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने हे पद खुले झाल्यास विजयभाऊ पाटील नगराध्यक्ष होतील, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.गेल्या ३0 वर्षाहून अधिक काळ नगराध्यक्ष कोणीही असला तरी, नगराध्यक्ष दालनात, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या आसनांच्या मधील खुर्चीचा मान पाटील यांच्यासाठी दिला गेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे नगराध्यक्षपद असो वा नसो, तेच महत्त्वाचे निर्णय घेतात. आगामी काळात नगराध्यक्षपद मिळो वा न मिळो, विरोधकांना निवडणुकीपूर्वीच गारद करण्यासाठी त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा नवीन फंडा काढला असल्याची चर्चा आहे.महाडिक युवा शक्तीचे राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांची मात्र भूमिका वेगळी आहे. विजयभाऊ पाटील यांनी अगोदर राष्ट्रवादीत असलेले गट एकत्र करावेत, त्यानंतरच बिनविरोधची भाषा करावी, असा सल्ला महाडिक यांनी दिला आहे. आगामी निवडणुकीसाठी विरोधक एकत्रित होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या खासदार राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. विस्तारानंतर ते इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. निवडणुकीत येणार रंगतसम्राट महाडिक यांनी जलाल मुल्ला आणि अॅड. जावेद मगदूम यांना ताकद देऊन इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. याला आव्हान म्हणून आता विद्यमान नगरसेवक पिरअल्ली पुणेकर यांनीही इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या दोघांनाही मागे टाकून एम.आय.एम.चे शाकीर तांबोळी यांनी यापूर्वीच इफ्तार पार्टी केली आहे. त्यामुळे इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत रंगत येणार आहे.
इस्लामपूर नगरपालिका बिनविरोधचा प्रस्ताव
By admin | Published: July 04, 2016 11:46 PM