इस्लामपूर : आधार यंत्राचे कीट देण्याचे आमिष दाखवत औरंगाबाद येथील दोघा भामट्यांनी इस्लामपूर शहरातील एकास गूगल पेद्वारे २८ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली. हा प्रकार जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधित झाला आहे. याबाबत संदीप भारत माने (२८, रा. कामेरी नाका, इस्लामपूर) यांनी बुधवारी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार गणेश चव्हाण आणि कृष्णा देविदास टकले (दोघे रा. औरंगाबाद) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माने हे खासगी नोकरी करतात. फेसबुकवर त्यांना या भामट्यांनी केलेली महा-ई-सेवा आधार सेंटर मनी ट्रान्सपोर्ट ही जाहिरात पाहायला मिळाली. माने यांनी या दोघांशी २० जुलै रोजी संपर्क साधून माहिती घेतली. चव्हाण आणि टकले याने अगोदर लोकेशन बुकिंग करण्यासाठी ३ हजार ९९९ रुपये पाठवा, त्यानंतर आधार यंत्रासाठी १८ हजार ९९९ रुपये एकरकमी पाठवा, असे माने यांना सांगितले.
माने यांनी २४ जुलै ते १६ सप्टेंबर या कालावधित त्यांच्या मोबाईलवरून गूगल पेद्वारे २८ हजार रुपये पाठवले. या भामट्यांनी चार-पाच दिवसांत तुमचे आधार कीट यंत्र येईल, अशी बतावणी केली. मात्र यंत्र न आल्याने माने यांनी विचारणा केल्यावर दोघांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संदीप माने यांनी पोलिसात धाव घेतली.