अशोक पाटील - इस्लामपूर -विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा विरोधकांचा डाव अंतिमक्षणी फसला. जिल्हा बँकेत विरोधकांची मोट बांधण्यासाठी खमके नेतृत्व मिळूनही काँग्रेसला यश मिळाले नाही. आता इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जयंत पाटील गटाविरोधात काँग्रेस, शिवसेना आणि महाडिक गटाने वेगवेगळे अर्ज भरले आहेत. यामुळे विरोधकांमध्ये एकी नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.इस्लामपूर मतदारसंघात शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी, आनंदराव पवार, सी. बी. पाटील, अभिजित पाटील, जितेंद्र पाटील, वैभव पवार आदी दिग्गज नेते जयंत पाटील यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात, परंतु या विरोधकांमध्ये एकी नसल्याने, प्रत्येकवेळी जयंत पाटील बाजी मारतात. सध्या बाजार समितीतही हीच परिस्थिती असल्याने निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे चित्र आहे.शिवाजीराव नाईक आणि सी. बी. पाटील यांच्यातील दरी आजही कायम आहे. आनंदराव पवार, वैभव पवार, विक्रम पाटील यांच्यामध्ये धुसफूस आहे. नानासाहेब महाडिक, काँगे्रसचे वाळवा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील व जितेंद्र पाटील यांच्यात अंतर्गत कलह आहे. या सर्व नेत्यांची मोट सध्यातरी कृष्णेच्या डोहात बुडाली आहे. ही मोट बांधण्यासाठी वाळवा तालुक्यात खमके नेतृत्व नाही. त्यातूनही एखादे नेतृत्व पुढे आल्यास त्याला कोणीही मान्यता देत नाही. प्रत्येकाचा अहंभाव जागा होतो. याचाच फायदा जयंत पाटील यांना मिळत आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी मोट बांधून निवडणूक लढविली. यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश मिळाले. इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधकांनी वेगवेगळे अर्ज भरले असले तरी, आम्ही एकत्र येऊन एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करू.- सी. बी. पाटील, संचालक, जिल्हा बँकराष्ट्रवादीतून निवडणूक लढविणाऱ्या व्यापारी गटातील उमेदवारांनी गेल्या पाच वर्षांपासून मार्केट सेस भरलेला नाही. त्यामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरवावेत यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. हमाल, तोलाईदार गटातून बाबूराव पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी राजारामबापू कारखान्यातील कोट्यवधीचे कंत्राट घेतले आहे. त्यालाही आक्षेप आहे.- विजय पवार, युवक काँग्रेस वाळवा तालुकाध्यक्ष.
इस्लामपुरात विरोधकांची मोट कृष्णेच्या डोहात
By admin | Published: June 26, 2015 11:08 PM