लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरासह वाळवा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी पोलीस बंदोबस्तात गर्दी होणाऱ्या आस्थापनांवर धडक कारवाई केली. तब्बल २० ठिकाणी कारवाई करत १० हजार रुपयांच्या दंडाची वसुली केली. बँका, पतसंस्था, औषध दुकाने आणि अत्यावश्यक सेवेत नसताना व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई झाली.
शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच शहरालगतच्या गावातील नागरिकही कामानिमित्त शहरात फिरत असतात. त्यातून बऱ्याच ठिकाणी गर्दी होत असते. या गर्दीला आळा घालण्यासाठी प्रांत देशमुख यांनी नियुक्त केलेल्या चार पथकांना सोबत घेत ही कारवाईची मोहीम राबविली.
गांधी चौक, यल्लामा चौक, आझाद चौक, शिराळा नाका, बस स्थानक परिसर अशा विविध ठिकाणी ही कारवाई केली. आजच्या कारवाईत त्यांनी नागरिकांची गर्दी होणाऱ्या बँका आणि पतसंस्थामध्येही जाऊन तेथील कर्मचाऱ्यांनी १०० टक्के लसीकरण करून घेतले आहे का? यासह लसीकरण झालेले नसल्यास कोरोना चाचणी करून घेतली आहे का? याची माहिती घेतली. या बाबी अपूर्ण असतील तेथे कारवाई केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, अत्यावश्यक नसलेल्या पण व्यवसाय करत असलेल्या ठिकाणीही धाडी टाकून दंड वसुली केली. या कारवाईत तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वंदना कांबळे आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
फोटो- इस्लामपूर शहरात प्रांत डॉ. विजय देशमुख यांनी पोलीस बंदोबस्तात गर्दी होणाऱ्या ठिकाणी कारवाई केली.