इस्लामपूर : वाळवा, शिराळा महसूल उपविभागाचे प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तिघा तलाठ्यांना कार्यालयात बोलावून घेत कोर्टरूममध्ये मारहाण केल्याची तक्रार जिल्हा तलाठी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, प्रांताधिकारी पाटील यांनी अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असे सांगत या मारहाणीचा इन्कार केला आहे.
अविनाश आनंदराव पाटील, महादेव रामचंद्र वंजारी, अमर मारुती साळुुंखे अशा तिघा तलाठ्यांना प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी सोमवार, दि. १५ मार्च रोजी कार्यालयीन वेळेनंतर रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास बोलावून घेतले. त्यानंतर प्रत्येकाला कोर्टरूममध्ये नेऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत, तसेच मोठमोठ्याने आरडाओरड करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली. या तिघा तलाठ्यांनी या घटनेची माहिती लेखी निवेदनाद्वारे जिल्हा तलाठी संघाकडे दिली.
त्यानंतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय तोडकर, कार्याध्यक्ष परशराम ओमासे, सरचिटणीस सुवाह औताडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रांताधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई होईपर्यंत १७ मार्च रोजी वाळवा उपविभाग, तर १८ मार्चपासून जिल्हाभरात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कोट
वाळवा, शिराळा तालुक्यात शंभरावर तलाठी कार्यरत आहेत. हे तिघे तलाठी प्रशासकीय कामकाजाव्यतिरिक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत अवमानकारक शब्द वापरत होते. त्याबाबत विचारणा करणे, यात गैर काय आहे, मारहाणीचा कोणताही प्रकार घडलेला नाही.
-नागेश पाटील, प्रांताधिकारी