लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील संशयितास पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. त्याला येथील न्यायालयाने २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यातील पीडित मुलगी ही गर्भवती राहिली होती. गर्भपात केल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.
अनिकेत प्रवीण वाडकर (२१, रा. हनुमाननगर, इस्लामपूर), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. यापूर्वी पोलीस दप्तरी त्याच्या नावावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद आहे. याप्रकरणी कराड येथील एका महिला सामाजिक कार्यकर्तीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. बलात्काराचा हा प्रकार नोव्हेंबर ते डिसेंबर २०२० या महिनाभराच्या कालावधीत घडला आहे.
वाडकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याने पीडित अल्पवयीन मुलीवर पहिल्यांदा जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर त्याने ही माहिती तुझ्या आई-वडिलांना देणार अशी भीती घालत आणि दमदाटी करीत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. त्यातून ही पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिली होती. कराड येथील खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात केल्यावर स्त्री जातीच्या मृत अर्भकाला तिने जन्म दिला. त्यानंतर अनिकेत वाडकर याच्या अत्याचाराविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाला. सहायक निरीक्षक अनिल जाधव अधिक तपास करीत आहेत.