अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत युतीतील जागा वाटपात इस्लामपूर मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला, तर शिराळा विधानसभा भाजपकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे बैठक झाली. यामध्ये आगामी विधानसभा एकत्रित लढण्यावर बैठक झाली. घटक पक्षांना १८ जागा देण्यावर एकमत झाले आहे. त्यानुसार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला किमान दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. इस्लामपूर मतदारसंघ खोत यांचे होमपीच आहे. त्यामुळे ही जागा रयत क्रांती संघटनेला जाण्याची शक्यता आहे.शिराळा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी निश्चित मानली जाते. परंतु महाडिक गटाचे सम्राट महाडिक कोणत्याही परिस्थितीत लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत काय तोडगा काढतात, यावर भाजपची उमेदवारी निश्चित आहे. विधानसभा निवडणूक विजयी होण्यासाठी लढण्याचा निर्धार आहे.सुंठेवाचून खोकला जाणार...इस्लामपूर मतदारसंघात भाजपकडून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे समर्थक वाळवा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी भाजपकडून उमेदवारीबाबत ‘आमचं ठरवलंय’ असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मात्र आधीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हे येथून इच्छुक आहेत. शिवाय शिवसेनेची आॅफर आली, तर राहुल महाडिक ती स्वीकारू शकतात. गौरव नायकवडी यांनीही महसूलमंत्री पाटील यांचा शब्द प्रमाण मानून वैभव नायकवडी यांच्या पराभवाचा वचपा काढू, अशी चर्चा सुरू केली आहे. या तिढ्यावर रामबाण उपाय म्हणून इस्लामपूरची जागा ‘रयत क्रांती’ला सोडणे म्हणजे युतीसाठी सुंठेवाचून खोकला गेल्यासारखे ठरणार आहे.
इस्लामपूर रयत क्रांतीला, तर शिराळा भाजपला शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:29 PM